लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाची ग्वाही
बेळगाव : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा म्युझियमची कामे (वीरभूमी) जवळ जवळ पूर्ण झाली आहेत. लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते म्युझियमचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती कन्नड व संस्कृती खाते आणि मागासवर्गीय कल्याण खात्याचे मंत्री शिवराज तंगडगी यांनी दिली. नंदगड येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा वस्तूसंग्रहालयाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवराज तंगडगी पुढे म्हणाले, सैनिक शाळा व म्युझियम अशी 261 कोटी रुपये खर्चाची कामे जवळजवळ पूर्ण झाली आहेत. 59 कोटी रुपये खर्चातून 13 एकर जमिनीत नंदगड येथील म्युझियम उभारण्यात आले आहे.कंपाऊंड, रस्ता, कलाकृती आदी कामे पूर्ण झाली आहेत. सिनेमा अॅनिमेटर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
संगोळ्ळी रायण्णा यांची वीर जीवनगाथा पूर्ण प्रमाणात कळावी यासाठी म्युझियम उभारण्यात आले आहे. या म्युझियममध्ये संगोळ्ळी रायण्णा अध्ययन केंद्र व त्यांच्याविषयी ग्रंथालयही असणार आहे. पर्यटकांना इतिहास सांगण्यासाठी रोबोटही असणार आहे. नव्या पिढीला इतिहास समजावून सांगण्याचे काम सरकार करीत आहे. नंदगड येथील तलावात पुतळा उभारण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल, असे दर ठरवून एक उत्तम पर्यटनस्थळ बनवण्यासाठी योजना आखण्यात आल्याचे शिवराज तंगडगी यांनी सांगितले. मंत्री व अधिकाऱ्यांनी परिसरातील सर्व विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर समाधीस्थळालाही भेट दिली. यावेळी कर्नाटक राज्य गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा, संगोळ्ळी रायण्णा प्राधिकरणाचे सदस्य का. त. चिक्कण्णा, प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक शालिनी व इतर उपस्थित होते.









