रत्नागिरीतील तरुणाविरोधात गुन्हा, महामार्गातील मालमत्तेचा मोबदला देतो सांगून फसवले
देवरुख : मिऱ्या–नागपूर महामार्गात गेलेल्या मालमत्तेचा मोबदला देतो असे सांगून पूर्वी सह्या करून घेतलेल्या धनादेशावर रक्कम टाकून कोंडगाव बाईगवाडी येथील सदानंद रमेश सावंत यांची 1 कोटी 84 लाख 2 हजार 260 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी येथील साजन बाळकृष्ण फटकरे याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंडगाव–साखरपा येथील सावंत यांच्या मालकीचे घर नं. 613, 1144, अ, ब, क ही मालमत्ता मिऱ्या–नागपूर या महामार्गाकरीता अधिग्रहीत झाली आहे. तुम्हाला महामार्गासाठी गेलेल्या मालमत्तेचा लवकरात लवकर मोबदला मिळवून देतो असे ऑक्टोबर 2022 मध्ये साजन फटकरे याने सावंत यांच्या घरी जाऊन सांगितले. तसेच सावंत यांच्याकडून सह्या करून 18 कोरे धनादेश घेतले होते. सावंत यांच्या खात्यावर मालमत्तेचा मोबदला म्हणून 2 कोटी 77 लाख 50 हजार 416 रुपये जमा झाले होते.
या रकमेपैकी 1 कोटी 84 लाख 2 हजार 260 रुपये रक्कम फटकरे याने पूर्वी सह्या करून घेतलेल्या धनादेशावर रक्कम लिहून सावंत यांच्या परवानगीशिवाय काढून फसवणूक केल्याचे तक्रारीत सावंत यांनी नमूद केले आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2023 कालावधीत घडला. या फसवणूक प्रकरणी फटकरे याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कायदा कलम 420, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवरुख पोलीस अधिक तपास करीत आहेत.








