वृत्तसंस्था / काठमांडू
दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंनी चमकदार कामगिरी करताना एकूण 16 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 13 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांचा समावेश आहे.
चालु वर्षी होणाऱ्या युवा आशियाई चॅम्पियनशिप टेबल टेनिस स्पर्धेसाठीची ही पात्र फेरीची स्पर्धा म्हणून घेतली गेली. या स्पर्धेत मुलींच्या 15 वर्षांखालील तसेच 19 वर्षांखालील आणि मुलांच्या 15 वर्षांखालील वयोगटात भारताच्या संघांनी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. तसेच 15 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील वयोगटात भारताने सर्व म्हणजे सहा सुवर्णपदके मिळविली. 19 वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या एकेरीमध्ये भारताने चार सुवर्णपदके पटकाविली. सदर स्पर्धेचे यजमानपद नेपाळने भूषविले होते. नेपाळने या स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलांच्या वयोगटात चौथे सुवर्णपदक मिळविले. सदर स्पर्धेत 5 संघांचा समावेश होता आणि ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविली गेली. गेल्या वर्षी भारताने आगामी युवा आशियाई टेबल टेनिस स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. काठमांडूमधील या स्पर्धेत सांघिक प्रकारात भारताच्या प्रिता वर्तीकर, अनन्या चांदी, हार्दी पटेल आणि दिया ब्रम्हचारी यांनी सुवर्णपदक मिळविताना नेपाळचा 3-1 असा पराभव केला. मुलींच्या 19 वर्षांखालील वयोगटात अनन्या चांदीने प्रिता वर्तीकरचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. प्रिताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.









