वृत्तसंस्था / अमान
येथे सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटाच्या पुरुष आणि महिलांच्या कनिष्ठ आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी आतापर्यंत 43 पदकांची कमाई केली आहे. त्याचप्रमाणे विविध वजन गटामध्ये भारताचे 21 मुष्टीयोद्धे सुवर्णपदकासाठी लढत देतील.
15 आणि 17 वर्षांखालील वयोगटामध्ये भारताचे 7 पुरूष आणि 6 महिला मुष्टीयोद्धांनी आपल्या वजन गटातून अंतिम फेरी गाठली आहे. महिलांच्या 17 वर्षांखालील वयोगटात 50 किलो वजन गटात आहाना शर्माने किर्जीस्थानच्या अमनटेव्हाचा, 44 ते 46 किलो वजन गटात भारताच्या खुशी चंदने युक्रेनच्या चेरव्हेटाचा 3-2 अशा गुणांनी, 54 किलो गटात जनतने, 60 किलो गटात सिमरनजित कौरने, 63 किलो गटात हर्षिताने तसेच 80 किलो वरील गटात अखशिकाने प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. पुरुषांच्या 17 वर्षांखालील वयोगटात 80 किलो गटात भारताच्या देवांशने व्हिएतनामच्या तियानचा 4-1 असा फडशा पाडत अंतिम फेरीत स्थान मिळविले. आशियाई मुष्टीयुद्ध फेडरेशनतर्फे सदर स्पर्धा पहिल्यांदाच कनिष्ठ गटात भरविली गेली आहे.









