वृत्तसंस्था / पर्थ
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला सलग दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली. या दौऱ्यातील येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने भारताचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
या दौऱ्यातील सलामीच्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने भारताचा पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये 13 व्या मिनिटाला ज्योती सिंगने भारताला आघाडी मिळवून दिली. पण ती अधिक वेळ राखता आली नाही. 17 व्या मिनिटाला इव्ही स्टेन्सबायने मैदानी गोल करुन ऑस्ट्रेलिया अ ला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 48 व्या मिनिटाला डेली डॉल्केन्सने ऑस्ट्रेलिया अ संघाचा दुसरा गोल केला. 52 व्या मिनिटाला जेमी लीने ऑस्ट्रेलिया अ संघाचा तिसरा गोल नोंदविला. सामना संपण्यास केवळ 1 मिनिट बाकी असताना सुनेलीता टोपोने मैदानी गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी थोडी कमी केली. मात्र ऑस्ट्रेलिया अ ने हा सामना जिंकला. या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्या 15 मिनिटांत पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमविली. आता या दौऱ्यात भारतीय महिला हॉकी संघाचा तिसरा सामना ऑस्ट्रेलिया वरिष्ठ महिला हॉकी संघाबरोबर गुरुवारी 1 मे रोजी खेळविला जाणार आहे.









