तिरंगी वनडे मालिका, भारत सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज
वृत्तसंस्था / कोलंबो
तिरंगी वनडे महिलांच्या क्रिकेट मालिकेतील येथे मंगळवारी भारत आणि द. आफ्रिका यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. भारतीय महिला संघाने या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान लंकेचा पराभव करत विजयी सलामी दिली असल्याने आता हरमनप्रित कौरची सेना सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे.
रविवारी या स्पर्धेतील झालेल्या सलामीच्या सामन्यात पावसाचा अडथळा आल्यानंतर भारताने यजमान लंकेचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला होता. अलिकडच्या कालावधीत भारतीय महिला संघाने सलग सात वनडे सामने जिंकले असून आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहतील. क्रिकेटच्या तिन्ही विभागात भारतीय संघातील खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यावर अधिक भर दिला आहे. स्नेह राणा, दिप्ती शर्मा आणि श्री चरणी या फिरकी त्रिकुटाने लंकन संघाला जेरीस आणले होते. तर प्रतिका रावल, उपकर्णधार स्मृती मानधना आणि हर्लिन देवोल यांनी फलंदाजीत उपयुक्त कामगिरी केली. मात्र द. आफ्रिका संघाला कमी लेखून चालणार नाही. 2022 मार्चपासून भारतीय महिला संघाने द. आफ्रिकाबरोबर एकही वनडे सामना गमविलेला नाही. यापूर्वी दोन्ही संघात झालेल्या वनडे मालिकेत भारताने द. आफ्रिकेच्या 3-0 असा पराभव केला होता. मंगळवारच्या सामन्यात द. आफ्रिकेच्या फलंदाजांची भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर सत्वपरीक्षा ठरेल. या मालिकेसाठी भारतीय संघामध्ये महत्त्वाचे वेगवान गोलंदाज सहभागी झाले नसल्याने आता अरुंधती रे•ाr, अमनज्योत कौर, दिप्ती शर्मा यांच्यावर नवा चेंडू हाताळण्याची जबाबदारी राहिल. या मालिकेसाठी द. आफ्रिका संघाला अनुभवी अष्टपैलु मेरीझेनी कॅपची उणिव चांगलीच भासेल. मात्र सुनेलुस, कर्णधार वूलव्हर्ट, डी. क्लर्क, क्लास, ट्रायॉन तसेच अष्टपैलु डर्कसेन यांची कामगिरी चांगली होणे जरुरीचे आहे. या सामन्याला मंगळवारी सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल.
भारत: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हर्लिन देवोल, हरमनप्रित कौर (कर्णधार), जेमीमा रॉड्रीग्ज, रिचा घोष, दिप्ती शर्मा, के. गौतम, अरुंधती रे•ाr, स्नेह राणा, श्री चरणी, यास्तिका भाटीया, अमनज्योत कौर, तेजल हसबनीस, सुची उपाध्याय
द. आफ्रिका: लॉरा वूलव्हार्ट (कर्णधार), ब्रिट्स, लूस, डर्कसेन, गुडॉल, नंदिनी डी. क्लर्क, ट्रायॉन, जेप्ता, स्मिट, मलाबा, क्लास, खाका, मेसो, शेनगेसी आणि एस. नायडू









