वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बाजार भांडवल मूल्याच्या बाबतीमध्ये नंबर एक वर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही निकाल नुकताच जाहीर झाला असून चौथ्या तिमाहीत कंपनीने 2,69,478 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिलायन्सने ही माहिती भारतीय शेअरबाजाराला दिली आहे.
मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 9.88 टक्के कमाई अधिक दिसून आली आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीने 2 लाख 45 हजार 249 कोटी रुपयांची कमाई केली होती. याच तिमाहीत कंपनीने 19 हजार 407 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. 2024 ला जानेवारी मार्चच्या दरम्यान 18951 कोटी रुपये निव्वळ नफ्याच्या माध्यमातून कंपनीने कमावले होते. मागच्या तुलनेमध्ये पाहता त्यामध्ये यावर्षी 2.40 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या महसुलामध्ये दहा टक्के वाढ झाली असून चौथ्या तिमाहीत 2 लाख 64 हजार 573 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत महसूल 9 टक्के वाढला आहे. लक्षात घ्या की जानेवारी ते मार्च 2024 यादरम्यान कंपनीने 2 लाख 40 हजार 715 कोटी रुपये महसूल प्राप्त केला होता.
समभागाची कशी राहिली कामगिरी
दरम्यान सोमवारी शेअरबाजारात कंपनीचा समभाग चांगला तेजीत राहिला. 6 टक्के इतका वाढत इंट्रा डे दरम्यान 1374 रुपयांच्या स्तरावर पोहचला होता. मार्च तिमाहीत निकाल अंदाजापेक्षा चांगला लागल्याने समभागाची चमक सोमवारी दिसली. शुक्रवारी 25 एप्रिल रोजी चौथ्या तिमाही निकालाच्या पूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग शेअर बाजारामध्ये काहीसा घसरणीसोबत 1301 च्या स्तरावर बंद झाला होता. मागच्या पाच दिवसांमध्ये समभाग 2.20 टक्के, एक महिन्यांमध्ये 1.21 टक्के आणि एक जानेवारी ते आत्तापर्यंत समभाग 6.53 टक्के इतका वाढला आहे. मात्र मागच्या सहा महिन्यांमध्ये पाहता समभाग 2 टक्के इतका घसरला आहे आणि एक वर्षांमध्ये पाहता 10 टक्के इतका घसरणीत राहिला आहे.
कोणकोणत्या उद्योगातून रिलायन्सने किती कोटी रुपयांची कमाई केली
ऑइल आणि गॅस 6,440 कोटी
रिटेल 88,637 कोटी
डिजिटल 40,861 कोटी
इतर कमाई 19,920 कोटी









