वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर करण्यात येणाऱ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात संरक्षण कंपन्यांचे समभाग चांगलेच चमकत असताना दिसून आले.
सोमवारी शेअर बाजारात पारस डिफेन्स, गार्डन रिच शिप बिल्डर्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि., भारत डायनामिक्स या कंपन्यांचे समभाग चांगलेच तेजीत राहिलेले दिसले. तज्ञांच्या अंदाजानुसार भारत पाकिस्तानविरुद्ध कारवाईचे पाऊल उचलू शकतो. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात संरक्षण कंपन्यांचे समभाग चमकताना दिसले. भारत आणि फ्रान्स यांच्यात 26 राफेल विमाने खरेदीचा व्यवहारही झाल्याचा परिणाम कंपन्यांच्या समभागावर दिसला.
पारस डिफेन्सचा समभाग 10 टक्के, एचएएलचा समभाग 5.57 टक्के आणि बीडीएलचे समभाग 5.42 टक्के वाढत बंद झाले. कोचीन शिपयार्डचे समभाग 6.10 टक्के तर माझगाव डॉक 4.77 टक्के आणि गार्डन रिच शिप बिल्डर्सचे समभाग 8.11 टक्के वाढत बंद झाले. भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये वर म्हटल्याप्रमाणे राफेल विमानांच्या खरेदीचा करार करण्यात आला असून या करारावर दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या स्वाक्षरी झाल्या आहेत. या अंतर्गत भारत फ्रान्सकडून 22 सिंगल सिटर आणि चार डबल सिटर विमाने खरेदी करणार आहे.









