भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात तरस प्राण्याविषयी जागृती : पर्यटकांना दिली माहिती
बेळगाव : वनखात्यामार्फत रविवारी आंतरराष्ट्रीय हायना (तरस) दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयात हायना प्राण्याबाबत जागृती करण्यात आली. यावेळी आरएफओ पवन कुरलिंग, डीवायआरएफओ एच. कुंद्री, प्रज्वल कुलकर्णी आदी उपस्थित होते. निसर्ग आणि वन्यप्राणी हे आपले दागिने आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वन्यप्राण्यांची संख्या टिकून रहावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे सांगत तरस प्राण्याविषयी माहिती देण्यात आली. भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयात इतर वन्यप्राण्यांबरोबर तरस देखील ठेवण्यात आले आहेत. यावेळी आलेल्या पर्यटकांना तरस प्राण्याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच त्याचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी संग्रहालयातील तरस प्राण्याचे पूजन करून वन्यप्राण्याविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी वन कर्मचारी उपस्थित होते.









