पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ : कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या 121 व्या भागात पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. या हल्ल्यात निष्पाप लोकांचे प्राण गेल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच भारत दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे प्रतिपादन करताना पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देणार असल्याचेही सुचित केले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ला दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांची निराशा दर्शवितो. यातून त्यांचा भित्रेपणा दिसून येतो. काश्मीरमध्ये शांतता परतत असताना शाळा आणि महाविद्यालये चांगल्या पद्धतीने कार्यरत होती. लोकशाही मजबूत होत असतानाच पर्यटनही वाढत होते. तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. काश्मीरचा हा विकास देशाच्या शत्रूंना न आवडल्याने दहशतवादी पुन्हा काश्मीर उद्ध्वस्त करू इच्छितात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध
‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना निश्चितपणे न्याय मिळेल असे आश्वासन मी पुन्हा एकदा देतो असे पंतप्रधान ‘मन की बात’मध्ये म्हणाले. या हल्ल्यामुळे माझ्या हृदयाला खूप वेदना झाल्या आहेत. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक नागरिकाचे हृदय हळहळले आहे. मी प्रत्येक भारतीय शोकसंतप्त कुटुंबांप्रती तीव्र सहानुभूती व्यक्त करतो. या हल्ल्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिक संतप्त असल्याचेही मी जाणून आहे. अनेक जागतिक नेत्यांनी मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे, असे ते म्हणाले.
देशवासियांची एकता हीच मोठी ताकद
दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत देशाची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. या आव्हानाला तोंड देण्याचा आपला निर्धार आपण बळकट केला पाहिजे. दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांविरुद्धच्या निर्णायक लढाईत 140 कोटी भारतीयांची एकता हे सर्वात मोठे शस्त्र आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
अंतराळ क्षेत्रातील यशाचे कौतुक
भारत आता अंतराळ क्षेत्रात एक मोठी शक्ती बनला आहे. एकाच मोहिमेत 104 उपग्रह प्रक्षेपित करून आपण जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देशही बनलो आहोत. भारत नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहे. देश गगनयान, स्पॅडेक्स आणि चांद्रयान-4 यासह अनेक महत्त्वाच्या मोहिमांसाठी तयारी करत आहे. आम्ही व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि मार्स लँडर मिशनवर देखील काम करत आहोत. आपले अंतराळ शास्त्रज्ञ त्यांच्या शोधांनी पुन्हा एकदा देशाला अभिमानाने भरून टाकतील, असा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला.









