आयबीने पोलिसांना सोपविली यादी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानी नागरिकांना त्वरित भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करत अनेक राज्य सरकारांनी पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. तर दिल्लीत सुमारे 5 हजार पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटविण्यात आली आहे. भारताच्या गुप्तचर विभागाने दिल्ली पोलिसांना या पाकिस्तानी नागरिकांची यादी सोपविली आहे.
आयबीने दिल्लीत राहत असलेल्या सुमारे 5 हजार पाकिस्तानी नागरिकांची यादी दिल्ली पोलिसांना सोपविली आहे. पोलीस आता या पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याचे काम करणार आहे. विदेशी क्षेत्रीय नोंदणीकरण कार्यालयाने (एफआरआरओ) ही यादी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला दिली असून पुढील पडताळणी आणि ओळख पटविण्यासाठी ती संबंधित जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करण्यात आली आहे.
या यादीत दीर्घकालीन व्हिसा प्राप्त असलेल्या आणि सूट देण्यात आलेल्या पाकिस्तानी हिंदू नागरिकांची नावेही यादीत सामील आहेत. ही यादी पडताळणीसाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला सोपविण्यात आली असून पाकिस्तानी नागरिकांना स्वत:च्या मायदेशी परतण्यास सांगण्यात आले आहे. मध्य आणि उत्तरपूर्व दिल्लीच्या जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या अधिक आहे.
या प्रकरणी एक बैठक बोलाविण्यात आली असून दिल्ली पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर वरिष्ठ अधिकारी स्थितीवर नजर ठेवून आहेत. दिल्ली पोलिसांच विशेष शाखा आणि आयबीच्या अधिकाऱ्यांना दिल्लीत राहत असलेल्या या पाकिस्तानी नागरिकांविषयी माहिती जमविणे आणि त्यांना लवकरात लवकर भारत सोडण्यास सांगण्याचे काम सोपविण्यात आले आहे.









