बेळगाव : शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी येथील चन्नम्मा राणी प्राणी संग्रहालयाचा उद्योग खात्री योजनेतंर्गत विकास साधण्यात आला आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यातही प्राणी संग्रहालय हिरवेगार दिसू लागले आहे. नरेगा अंतर्गत प्राणी संग्रहालयातील अंतर्गत भागात दोन विहिरी, दोन तलावांची उभारणी करून पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. त्याबरोबर वन खात्याने तीन कूपनलिकांची खोदाई केली आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्याबरोबर वाढत्या उन्हात वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी कारंज्याची (फवाऱ्याची) व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यस्थितीत वाघ, सिंह, हरीण, मगर, बिबटे, कोल्हे, अस्वल, सांबर यासह विविध पशुपक्ष्यांच्या 205 प्रजाती ठेवण्यात आल्या आहेत.
हे संग्रहालय 40 हेक्टर क्षेत्रात पसरले असले तरी सध्या प्राण्यांच्या संख्येनुसार संग्रहालयासाठी अद्याप 35 हेक्टरची गरज आहे. नरेगा योजनेतंर्गत तीन कोटींचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. तलाव, विहिरी, प्रवेशद्वार, पेव्हर्स, विहाराचा मार्ग, गटारी, रस्ते, शौचालय, प्राण्यांसाठी कोठडी, जाळे आणि पक्षी संग्रहालय उभारण्यात आले आहे. विशेषत: जलस्त्राsतांची निर्मिती करून संग्रहालयात पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. शिवाय कडक उन्हाळ्यात देखील मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे संग्रहालय हिरवाईने फुलू लागले आहे. 2019 पासून या ठिकाणी विविध प्राणी आणि पक्षी आणण्यात आले आहेत. यासाठी प्राण्यांना ठेवण्यासाठी स्वतंत्र कोठडी उभारण्यात आल्या आहेत. सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे, मगर, हरीण यांना स्वतंत्र होर्ल्डींग रुम उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
टायगर सफारीसाठी 20 हेक्टर परिसराची गरज
टायगर सफारीसाठी 20 हेक्टर परिसराची गरज आहे. सद्यस्थितीत कमी अंतरात मिनी टायगर सफारी सुरू आहे. त्याबरोबर जिराफ, गवीरेडे, झेब्रा, काळवीट, रानडुक्कर, शहामृग आदी प्राण्यांसाठी स्नेक पार्कची गरज आहे.









