भारताने सज्ज केली योजना, पाकिस्तानला धक्का
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पेहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी असणारा सिंधू जलवितरण करार स्थगित केला आहे. या निर्णयाचे कार्यान्वयन भारत तीन टप्प्यांमध्ये करणार आहे. या निर्णयाचा काही भाग त्वरीत, काही भाग काही काळानंतर तर काही भाग दीर्घकालीन पद्धतीने लागू केला जाणार आहे, अशी महत्वपूर्ण माहिती केंद्रीय जल संसाधन मंत्री चंद्रकांत आर. पाटील यांनी शुक्रवारी दिली आहे.
पाकिस्तान जो पर्यंत दहशतवाद सोडत नाही, तो पर्यंत त्याला एक थेंब पाणी मिळू द्यायचे नाही, असा निर्धार भारताने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिकृत निवासस्थानी शुक्रवारी भारताने घेतलेल्या निर्णयासंबंधात एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत या निर्णयाचे कार्यान्वयन करण्यासंबंधी रुपरेषा निर्धारीत करण्यात आली. भारताने सिंधू जल करारासंबंधी जो निर्णय घेतला आहे, तो पूर्णत: त्वरित लागू करता येणे अशक्य आहे. पाकिस्तानात वाहून जाणाऱ्या या सर्व पाण्याचा उपयोग भारतात करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. हे कार्य लवकरात लवकर करण्याचा भारताची भारताची योजना आहे. त्यानंतर हा निर्णय खऱ्या अर्थाने लागू होऊ शकणार असून त्यानंतर पाकिस्तानची जलकोंडी करणे भारताला शक्य होणार आहे. भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तातही चिंतेत आहे.
जागतिक बँकेला माहिती देणार
भारताने सिंधू जलकरार स्थगित केला आहे, याची माहिती अद्याप आम्हाला देण्यात आलेली नाही, असे प्रतिपादन जागतिक बँकेने केले आहे. मात्र, या निर्णयाची माहिती सविस्तरपणे या बँकेला दिली जाईल, अशी स्पष्टोक्ती केंद्र सरकारने शुक्रवारी केली. जागतिक बँक या करारामधील एक पक्ष आहे. त्यामुळे ही माहिती बँकेला देणे भारतासाठी अनिवार्य आहे, असे तज्ञांचे मत आहे.
पाकिस्तानने मोडल्या अटी
सिंधू जलकराराच्या अटी पाकिस्तानने मोडल्या आहेत. त्यामुळे आम्ही हा करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे. यासंबंधात भारताने पाकिस्तानला आधी माहिती दिली. भारताच्या जलसंसाधन विभागाच्या सचिव देवश्री मुखर्जी यांनी आपल्या पाकिस्तानी समकक्ष अधिकाऱ्याला यासंबंधात पत्र पाठविले आहे. जम्मू-काश्मीरला लक्ष्य करुन पाकिस्तान सातत्याने सीमेवर दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, असे प्रतिपादन या पत्रात आहे.
केला भारताचा अवमान
कोणत्याही कराराचे कार्यान्वयन प्रत्येक देशाने सन्मान आणि श्रद्धापूर्वक करावयास हवे. पाकिस्तानने हे पथ्य पाळलेले नाही. पाकिस्तान सातत्याने सीमा प्रदेशात दहशतवादाला प्राधान्य देऊन भारताचा अवमान करीत आहे. सीमा प्रदेशात पाकिस्तानमुळेच दहशतवाद जिवंत आहे. त्यामुळे भारताने अनेक दशकांपूर्वी करण्यात आलेला सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला तसे करण्यास पाकिस्ताननेच भाग पाडले आहे, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.









