काँग्रेस उमेदवाराला मिळाली केवळ 8 मते : ‘आप’चा निवडणुकीवर बहिष्कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचे नगरसेवक इक्बाल सिंह हे दिल्लीचे महापौर म्हणून निवडले गेले आहेत. इक्बाल सिंह यांना 133 तर काँग्रेसचे उमेदवार मनदीप यांना केवळ 8 मते मिळाली आहेत. तर जयभगवान यादव हे उपमहापौर झाले आहेत. याचबरोबर दिल्ली महापालिकेच्या सत्तेवर दोन वर्षांनी भाजपची वापसी झाली आहे. यापूर्वी आम आदमी पक्ष दिल्ली महापालिकेत बहुमतात होता.
दिल्लीच्या जनतेने आम्हाल शहराच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी सोपविली आहे. आम आदमी पक्षाने पूर्वीच स्वत:चा पराभव मान्य केला आहे. आता आम्ही भ्रष्टाचार संपवू आणि मागील दोन वर्षांमध्ये थांबलेली कामं पूर्ण करू असे उद्गार नवे महापौर इक्बाल सिंह यांनी काढले आहेत.
‘आप’च्या माजी महापौर शैली ओबेरॉय आणि पक्षाचे नेते मुकेश गोयल यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेत महापौर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. भाजपने लोकशाहीच्या प्रक्रियेची थट्टा केली असल्याचा त्यांनी आरोप केला. तर काँग्रेसच्या वतीने मनदीप सिंह यांनी महापौर तर अरीबा खान यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला होता.
दिल्ली महापौर निवडणुकीत मतदानासाठी 238 नगरसेवकांसह 10 खासदार (7 लोकसभा, 3 राज्यसभा) आणि 14 आमदार सामील करण्याची तरतूद आहे. तर विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी 14 आमदारांमध्ये 11 भाजपचे तर 3 आम आदमी पक्षाचे आमदार निवडले होते.









