परिवारासोबत बोलू देण्याची अनुमती नाकारली
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
26/11 मुंबई हल्ल्यांचा आरोपी तहव्वुर राणाला परिवाराशी बोलण्याची अनुमती मिळाली नाही. दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आहे. न्यायालयात ही सुनावणी इन-कॅमेरा झाली असून न्यायालयाने स्वत:चा आदेश बुधवारी राखून ठेवला होता. तपास अत्यंत संवेदनशील टप्प्यात असून तहव्वूर राणा परिवाराशी संपर्क साधून महत्त्वाची माहिती उघड करू शकतो असा युक्तिवाद एनआयएने तहव्वूरच्या याचिकेला विरोध करताना केला. न्यायालयाने एनआयएच्या युक्तिवादांशी सहमती दर्शवित तहव्वूरची याचिका फेटाळली आहे. तहव्वूर राणाने एनआयए कोठडीदरम्यान स्वत:च्या परिवाराशी फोनवरून बोलण्याची अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका एनआयए न्यायालयासमोर केली होती. तहव्वूरला सध्या 2 मे पर्यंत एनआयएची कोठडी सुनावण्यात आली आहे. तहव्वूर हा विदेशी नागरिक असून त्याचा परिवार त्याच्या स्थितीवरून चिंतेत असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला होता. तहव्वूरच्या वकिलाने या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. तहव्वूरची दररोज 8-10 तास चौकशी केली जात आहे. तसेच तो चौकशीत सहकार्य करत असल्याचे समजते. चौकशीचे नेतृत्व एनआयएच्या मुख्य अधिकारी जया रॉय करत आहेत. राणाला दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये एनआयए मुख्यालयाच्या अत्यंत सुरक्षाप्राप्त कोठडीत ठेवण्यात आले आहे. तेथे 24 तास तैनात सुरक्षा जवान त्याच्यावर नजर ठेवून आहेत.









