पत्नी-मुलांसह दिली भेट : अदभूत वास्तू असल्याचे काढले उद्गार
वृत्तसंस्था/ आग्रा
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी पत्नी उषा आणि मुलांसोबत ताजमहालला भेट दिली आहे. सुमारे दीड तासांपयंत परिवारासोबत जेडी वेन्स यांनी प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या जगप्रसिद्ध इमारतीचे सौंदर्य अनुभवले आहे. यादरम्यान त्यानी विजिटर बुकमध्ये ‘ताजमहाल वास्तवात अद्भूत आहे’ असे नमूद केले आहे.
वेन्स यांच्या पत्नी उषा या इतिहासात पदवीधर आहेत आणि त्यांना इतिहास जाणून घेण्याबद्दल अत्यंत रुची होती. उषा वेन्स यांनी यावेळी संबंधितांना ताजमहालसंबंधी अनेक प्रश्न विचारले.
ताजमहाल परिसरात पोहोचताच अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी पत्नी आणि मुलांसोबत छायाचित्रे काढून घेतली आहेत. तत्पूर्वी खेरिया विमानतळावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत पेले. अमेरिकेचे उपाध्यक्ष वेन्स यांच्या सुरक्षेकरता मार्गावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रद्द करण्यात आले.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांना राज्य अतिथीचा दर्जा देण्यात आला होता. याचमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: विमानतळावर जात त्यांचे स्वागत केले. तर विमानतळावरून ताजमहालपर्यंतचा वेन्स यांनी कुटुंबासमवेत कारने प्रवास केला. त्यांच्या ताफ्याच्या मार्गाला विशेष स्वरुपात सजविण्यात आले होते. मोठ्या संख्येत शालेय विद्यार्थ्यांनी अमेरिका आणि भारताचे ध्वज हातात घेत त्यांचे स्वागत केले. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी तीन दिवसांपूर्वीच आग्रा येथे तळ ठोकून सुरक्षेची पाहणी केली होती. ताज कॉम्प्लेक्समध्ये सुमारे तासभर व्यतित केल्यावर वेन्स हे कुटुंबासह आग्रा येथून जयपूर येथे परतले आहेत.
वेन्स दांपत्याने सोमवारी स्वत:च्या भारत दौऱ्याची सुरुवात यमुना किनाऱ्यानजीकच्या अक्षरधाम मंदिरात दर्शनापासून केली होती. यानंतर त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.









