कणकुंबी : बेळगाव, चोर्ला, गोवा रस्त्यापैकी किणये ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आलेला दुर्गंधीयुक्त कचरा म्हणजे कचरा टाकायचे केंद्र किंवा कचरा डेपोच, अशी अवस्था सध्या चोर्ला रस्त्याच्या बाबतीत आहे. रस्त्याच्या दुतर्फा पाहिले असता ठिकठिकाणी कचरा डेपोचे स्वरूप पहायला मिळते. कालच जागतिक वसुंधरा दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. पण चोर्ला रस्त्यावरील कचऱ्याच्या बाबतीत काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. किणये ते चोर्ला (गोवा हद्द) पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी बेळगाव आणि गोव्यातील कचरा टाकण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
कणकुंबी भागातील पारवाड क्रॉस, चिखले, बेटणे, आमटे ते कालमणी दरम्यान अनेक ठिकाणी गोव्यातील कचरा टाकला जातो. तसेच किणये, उचवडे, बैलूर क्रॉस ते कुसमळीपर्यंत बेळगाव परिसरातील कचरा टाकण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. भाजीपाला तसेच हॉटेलमधील कचरा किंवा व्यावसायिकांकडून कचरा रस्त्याच्या कडेलाच टाकला जात आहे. कचरा टाकण्याचे काम काही ठराविक टेम्पो चालक किंवा कॅन्टरचालकच करत आहेत. बेळगावहून गोव्याकडे जाणाऱ्या काही वाहनातून तसेच गोव्याहून बेळगावकडे येणाऱ्या काही वाहनांमधून हा कचरा रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात येत आहे. यावर पोलीस प्रशासन किंवा वनखाते देखील राजरोसपणे बघ्याची भूमिका घेत असून अशा वाहनधारकांवर कोणतीच कारवाई केली जात नाही.









