आजपासून दर्शन : प्राणीप्रेमींमध्ये उत्सुकता
बेळगाव : भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात दाखल झालेली भृंगा नावाची सिंहीण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे तिचे बुधवारपासून जवळून दर्शन होणार आहे. म्हैसूर बन्नेरघट्टा येथील प्राणी संग्रहालयातून भृंगा सिंहिणीला मार्च अखेरीस आणण्यात आले होते. दरम्यान, स्थानिक वातावरणात जळवून घ्यावे, यासाठी तिला स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले होते. आता तिला पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
शहरापासून जवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास साधण्यात आला आहे. या प्राणी संग्रहालयात वन्य प्राणी आणण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. सद्यस्थितीत शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. प्राणी संग्रहालयात वाघ, अस्वल, मगर, कोल्हे, तरस, हरिण, मोर, सांबर, चितळ, काळवीट, सिंह यासह विविध दुर्मीळ पक्षीही ठेवण्यात आले आहेत. त्याबरोबरच आता भृंगा सिंहिणीचे दर्शन होणार आहे.
संग्रहालयात तीन सिंह आणण्यात आले होते. मात्र, 2021 मध्ये नकुल तर 2025 मध्ये निरुपमा नावाच्या सिंहिणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संग्रहालयात केवळ एकच नर जातीचा सिंह शिल्लक राहिला होता. या सिंहाच्या जोडीला मार्च महिन्याच्या अखेरीस सिंहीण आणण्यात आली आहे. त्यानंतर काही दिवस तिला स्थानिक वातावरणात समरस होण्यासाठी स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले होते. आता तिला पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे या सिंहिणीची गर्जना ऐकण्यासाठी भुतरामट्टीत पर्यटकांची गर्दी होणार आहे.









