विविध कार्यक्रमांसह प्रवचन-कीर्तनाची सेवा : बेळगाव, खानापूरसह चंदगड तालुक्यातून वारकरी सहभागी
बेळगाव : अनगोळ येथील एसकेई स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानात सुरू असलेल्या तुकोबांच्या अखंड गाथा पारायण सोहळ्याला वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. विविध कार्यक्रमासाठी वारकरी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठागमन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने दैनंदिन काकड आरती, गाथा पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, जागर भजन आदी कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. या कार्यक्रमासाठी बेळगाव, खानापूर आणि चंदगड तालुक्यातून वारकरी येऊ लागले आहेत.
सोमवार दि. 21 रोजी दुसऱ्या दिवशी पहाटे काकडआरती झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुकांना आभिषेक घालण्यात आला. त्यानंतर तुळस पूजन करण्यात आले. दुपारी महिलांचे भजन तर सामुदायिक हरिपाठ झाला. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दिंडी प्रमुख हभप जगन्नाथ महाराज देशमुख यांचे प्रवचन झाले. त्यानंतर 7 ते 9 यावेळेत भक्त शिरोमणी संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज, श्री क्षेत्र पंढरपूर हभप ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे कीर्तन झाले. यावेळी विविध भागातील भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर रात्री जागर भजनाचा कार्यक्रम पार पडला.









