यंदाच्या हंगामात प्राधान्य : सामाजिक वनीकरण विभागामार्फत तयारी
बेळगाव : वृक्षसंवर्धन आणि वाढीसाठी विविध ठिकाणी रोप लागवड केली जाणार आहे. विशेषत: पडीक जमिनीत वृक्ष लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात पडीक जमीन हिरवाईने फुलणार आहे. पिकाविना पडीक असलेल्या जमिनीत यंदाच्या पावसाळ्यात रोप लागवड होणार आहे. अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाने दिली आहे. शहर आणि ग्रामीण भागात कोरडवाहू जमिनीचे क्षेत्रही अधिक प्रमाणात आहे. हे क्षेत्र पिकाविना पडून आहे. या जमिनीचा वापर आता केला जाणार आहे. अशा जमिनीत विविध जातींचे रोपे लावली जाणार आहेत. वनखात्यामार्फत यासाठी नर्सरीत रोपे तयार करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
वनखाते दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला लाखो रोपांची लागवड करते. डोंगर क्षेत्रात वनरोपे तर शहर आणि ग्रामीण भागात विविध जातीची रोपे लावली जातात. त्यामध्ये जांभूळ, वड, चिंच, फणस, आवळा आदींचा समावेश आहे. याबरोबरच आता यंदाच्या वर्षी पावसाळ्यादरम्यान कोरडवाहू असलेल्या पडीक जमिनीत रोप लागवडीला चालना दिली जाणार आहे. गतवर्षी अथणी तालुक्यातील तेलसंग या ठिकाणी 600 एकर पडीक क्षेत्रात रोप लागवड झाली आहे. त्यामुळे परिसर हिरवागार झाला आहे. या धरतीवर इतर ठिकाणीही विविध जातींची रोपे लावली जाणार आहेत. यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. नर्सरीमध्ये रोपवाटिका तयार करून संवर्धन केले जात आहे. पडीक जमिनीत रोप लागवड झाल्यास त्यापासून लाकूड, फळे, फुले, मिळणार आहेत. विशेषत: स्थानिक पातळीवर विविध फळांची चव चाखता येणार आहे.









