वार्ताहर/काकती
धनगरी ढोल, कैताळाचा गंगनाला भिडलेला निनाद, भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीने सारा आसमंत जणू सोनेरी झाला होता. विठ्ठल-बिरोबाच्या दोन दिवस चालेल्या यात्रेची सांगता सोमवारी महाप्रसादाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली. काकती येथील धनगर समाजाचे अराध्यदैवत श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेचा आरंभ भावकाई गल्ली येथील देवस्थान मंदिरात झाला. रविवारी सकाळी देवाला अभिषेक घालण्यात आला. परंपरेनुसार दिवसभर धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर बहरुन गेला होता. काकती, पिरनवाडी, शिंदोळी, मुतगा, कडोली येथील भाविक रात्री 10 वाजल्यापासून धनगरी ओव्या व सवाल जबाबात सहभागी झाले होते. सोमवारी सकाळी 9 पासून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.
दुपारी 1 च्या दरम्यान विठ्ठल-बिरोबाची पालखी सिद्धेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातली. भंडारा व नैवेद्य दिला. सर्व गल्ल्यांतून सुवासिनींनी आरती ओवाळून औक्षण केले. नवस केलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली. जात, धर्म, पंत बाजूला ठेवून पंचक्रोषीतील भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. विठ्ठल-बिरोबाच्या नावानं चांगभल’चा भाविक जयघोष करीत होते. देवस्थानच्या ठिकाणी दुपारी 4 वाजता ढोल, कैताळाच्या एका लयीतील जागराला नवे उधाण आले होते. देवस्थानच्या प्रांगणात सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा झाला. ग्राम पंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, सिद्धेश्वर देवस्थान पंचमंडळाचे अध्यक्ष सिद्धाप्पा गाडेकर, पंच मंडळी, मानकरी आदी महाप्रसादाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रात्री उशीरापर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.









