वार्ताहर/नंदगड
राज्य वकील संघटनेचे माजी अध्यक्ष व सिनिअर अॅड. सदाशिव रेड्डी यांच्या ऑफिसमध्ये अज्ञात व्यक्तीने घुसून त्यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांना दुखापत केली आहे. त्याच्या निषेधार्थ खानापूर वकील संघटनेतर्फे खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, वकिलांच्यावर वारंवार किरकोळ गोष्टीसाठी हल्ले होत आहेत. या संदर्भामध्ये कर्नाटक सरकारने वकील संरक्षण कायदा अंमलात आणलेला आहे.
परंतु यामध्ये आता गंभीर दुरुस्ती करून सदर आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा उग्रे आंदोलन व बेमुदत उपोषणाचा इशारा खानापूर वकील संघटना अध्यक्षांनी दिला आहे. वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले, वारंवार वकिलांवर भ्याड हल्ले होत असल्यामुळे वकिलांना निर्भीडपणे पक्षकांरासाठी न्याय देण्याचे काम करणे कठीण झाले आहे. यासाठी पोलिसांनी तात्काळ क्रम घेऊन कारवाई करावी. यावेळी खानापूर वकील संघटनेचे अॅड. आर. एन. हिरेमठ, आर. एन. पाटील, जी. जी. पाटील, एस. आर. तारिहाळ, पुष्पा मादार, स्वाती पाटील व इतर उपस्थित होते. तहसीलदार कोमार यांनी निवेदन शासनाला पाठवून देण्याचे आश्वासन दिले.









