वृत्तसंस्था / बेंगळूर
सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी येथून ऑस्ट्रेलियाला प्रयाण केले. भारतीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मित्रत्वाचे पाच हॉकी सामने खेळणार आहे. या सामन्यांना पर्थ येथे 26 एप्रिलपासून प्रारंभ होईल.
या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात 26 आणि 27 एप्रिलला दोन हॉकी सामने खेळविले जातील. त्यानंतर भारत महिला हॉकी संघ व ऑस्ट्रेलिया महिला वरिष्ठ हॉकी संघ यांच्यात 1, 3, 4 मे रोजी हॉकीचे तीन सामने पर्थच्या हॉकी स्टेडियमवर खेळविले जातील. भारतीय महिला हॉकी संघाचे उपकर्णधारपद नवनीत कौरकडे सोपविण्यात आले आहे. 7 जूनपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या प्रो लीग युरोपियन टप्प्याच्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाचा हा दौरा सरावाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे.









