एके-47, इन्सास रायफलसह शस्त्रास्त्रे जप्त, शोधमोहीम सुरू
वृत्तसंस्था/ बोकारो
झारखंडमधील बोकारो येथे सोमवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. बोकारो जिल्ह्यातील लुगू आणि झुमरा टेकड्यांमधील जंगलात ही चकमक झाली. घनदाट जंगलात केलेल्या या कारवाईत माओवादी प्रयाग मांझी उर्फ विवेकसह आठ नक्षलवादी मारले गेले. त्यांच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. ही मोहीम 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेचा एक भाग आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 5:30 च्या सुमारास ही चकमक सुरू झाली. त्यानंतर अडीच तास अधूनमधून गोळीबार सुरू राहिला. या कारवाईत सीआरपीएफच्या 209 कोब्रा बटालियन आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाचा सहभाग होता. चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-47 रायफल, चार इन्सास, एक एसएलआर, आठ देशी बनावटीच्या बंदुका आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले.
डीजीपी अनुराग गुप्ता यांनी या मोहिमेबाबत माध्यमांना माहिती दिली. प्रयाग मांझी उर्फ विवेक व्यतिरिक्त नक्षलवादी साहेब राम मांझी आणि अरविंद यादव उर्फ अविनाश यांच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस होते. मृतांपैकी तीन नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. उर्वरित नक्षलींची ओळख पटवली जात आहे. सर्व नक्षलवादी सदर भागात सक्रिय असलेल्या एका मोठ्या पथकाचा भाग होते, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
कोणताही सैनिक जखमी नाही, ऑपरेशन यशस्वी
या संपूर्ण कारवाईत कोणताही सैनिक जखमी झाल्याचे वृत्त नाही. कोब्रा बटालियनला जंगलयुद्धात तज्ञ मानले जाते. हे जवान नक्षलग्रस्त भागात कायम कार्यरत असतात. आठ नक्षलवाद्यांच्या खात्म्यानंतर त्यांच्याकडून अन्य सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. चकमकीनंतर परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे.
लुगू व झुमरा टेकड्या नक्षलवाद्यांचे जुने गड
लुगू आणि झुमरा टेकड्या बऱ्याच काळापासून नक्षलवाद्यांचे गड मानले जातात. येथून अनेक मोठ्या नक्षलवादी कारवाया पार पडल्या आहेत. अशा परिस्थितीत ही चकमक सुरक्षा दलांचा एक मोठा सामरिक विजय मानली जात आहे. छत्तीसगडमध्ये यावर्षीच सशस्त्र दलांनी 140 हून अधिक नक्षलवादी मारले आहेत.









