ढोलताशा-ध्वजपथक, लाठीमेळ्यांच्या सरावाला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव शहरात पारंपरिक पद्धतीने ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षी ही मिरवणूक गुरुवार दि. 1 मे रोजी काढली जाणार असून त्यासाठी शिवजयंती मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. सध्या परीक्षांचा कालावधी संपल्याने मंडळांकडून लाठीमेळा, ढोलताशा तसेच सजीव देखाव्यांच्या तालीम घेतल्या जात आहेत. रात्री उशिरापर्यंत युवा मंडळींचा सराव सुरू आहे. यावर्षी 29 एप्रिल रोजी परंपरेने शिवजयंती साजरी होणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी अक्षय्यतृतीया असून 1 मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाणार असल्याचे शिवजयंती उत्सव महामंडळाने बैठकीत स्पष्ट केले. डीजेचे प्रमाण वाढल्यानंतर चित्ररथ व देखाव्यांची संख्या कमी होत गेली. तरीदेखील बेळगावमधील 40 तर शहापूर, वडगाव व अनगोळ येथील आठ ते दहा मंडळे चित्ररथामध्ये सहभाग घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रसंगांची निवड करून देखावे सादर करण्यात येत असतात.
आवाज ढोलताशांचा
बेळगावमध्ये मागील दहा वर्षात ढोलताशा पथकांची संख्या वाढली आहे. पूर्वी महिलांचे एक तर पुरुषांची दोन ते तीन इतकीच पथके होती. परंतु, सध्या ही संख्या 10 ते 12 वर पोहोचली आहे. शालेय तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्याने युवावर्ग सरावासाठी मेहनत घेत आहे. खुली मैदाने तसेच बंदिस्त हॉलमध्ये सराव सुरू आहे. त्यामुळे ढोलताशांचा आवाज सर्वत्र घुमू लागला आहे. त्यांच्याच साथीला युवतींचे ध्वजपथक जय्यत तयारी करीत आहे. चित्ररथ मिरवणुकीमध्ये ढोलताशासोबत शिवकालीन मर्दानी खेळ व लाठीमेळा सादर केला जातो. लाठीमेळा मंडळांची संख्या यापूर्वी कमी होती. परंतु, शिवभक्तांच्या मागणीनुसार ती वाढविण्यात येत आहे. लाठीकाठी शिकण्यासाठी अनेक युवक सध्या सराव करत आहेत. त्याचबरोबर सजीव देखाव्यांचे पात्रांनुसार सराव केले जात आहेत. काही ठिकाणी योग्य पात्र मिळत नसल्याने इतर मंडळांशी संपर्क साधून योग्य पात्र मिळविण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे.









