अवकाळी पाऊस, हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट : शेतकरी वर्गामध्ये चिंता : चांगल्या दराची अपेक्षा
वार्ताहर/किणये
शेतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये फळबाग शेती हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तरीही बागायतदार शेतकऱ्यांना काळानुरूप अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. तसेच हवामानातही कमालीचा बदल झाला. यामुळे काजूचा मोहोर खराब झाला. परिणामी उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अडीच ते तीन महिने काजू हंगाम जोमाने सुरू असतो. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत बेळगाव जिह्यात काजू उत्पादनात वाढ झालेली आहे. यंदा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून काजूच्या झाडांना मोहोर फुलण्यास सुरुवात झाली. तर सध्या काजू फळधारणेचा मुख्य हंगाम आहे. हवामानातील वारंवार बदलामुळे व अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली असल्याची माहिती काजू उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.
बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यातील बहुतांशी भागात काजूचे उत्पादन घेण्यात येते. काजूच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. काजू गोळा करून त्याची विक्री करण्यात येते. तसेच काजूच्या मुरट्याला मागणी वाढत असल्यामुळे स्थानिक टेम्पोमालक थेट बागांमधून मुरट्यांची उचल करत आहेत. बेळगाव तालुक्यातील किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, संतीबस्तवाड, वाघवडे, नावगे, बिजगर्णी, बेळवट्टी, कावळेवाडी, बेळगुंदी, बोकनुर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, इनाम बडस, बाकनुर, बाची, बामणवाडी, बाळगमट्टी या भागात सर्वाधिक काजूचे उत्पादन घेण्यात येते. काजूच्या झाडांची सुरुवातीची तीन वर्षे देखभाल करावी लागते. त्यानंतर मात्र निसर्ग नियमाप्रमाणे वाढ होत जाते. यामुळे या बागायतीसाठी अल्पप्रमाणात खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या पाठबळ देणारी काजुबाग ठरत आहे.
शेतातील बांधावर खास बागायती करून काजू बागा तयार करण्यात येत आहेत. रोप लागवडीनंतर प्रारंभी त्याला खतपाणी देऊन त्याची देखभाल करण्यात येते. तसेच माळरानावरील काजूझाडे जनावरे व इतर प्राणी खाऊ नयेत यासाठी झाडांवर शेणाचा शिंतोडा मारण्यात येतो. लागवडीच्या तीन वर्षांनंतर काजू फळधारणेला सुरुवात होते. काजूच्या मुरठ्यालाही गोव्यातून चांगली मागणी होऊ लागली आहे. यामुळे स्थानिक टेम्पोमालक काजूच्या हंगामात दोन ते तीन महिने पश्चिम भागातील काजू मुरटे गोव्याला घेऊन जात आहेत. एका मध्यम मुरट्याच्या डब्याला पंधरा रुपये दर देण्यात येत आहे. पश्चिम भागातील सुमारे 30 ते 35 टेम्पोची वाहतूक रोज गोव्याला होत आहे, अशी माहिती काही टेम्पोमालकांनी दिली आहे. काजू बागायती साफसफाई व काजू मोठे जमा करण्यासाठी आलेल्या मजुरांना दिवसाला 200 ते 250 रुपये इतकी मजुरी देण्यात येत असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.
काजूला प्रति किलो 170 रुपये दर हवा!
बाजारात काजूच्या दराला प्रति किलो 700 ते 1000 रुपये इतका दर आहे. या तुलनेत मात्र कमी दर मिळत आहे. काजूला सध्या प्रति किलो 145 ते 150 रुपये असा दर सुरू आहे. मात्र काजूचे उत्पादन कमी असल्यामुळे हा दर परवडणारा नाही. काजूला किमान 170 ते 175 रुपये इतका दर मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
– अरुण गुरव, शेतकरी
तरुणांनी काजू प्रक्रिया व्यवसायाकडे वळावे
पश्चिम भागात काजूच्या बागायती अधिक प्रमाणात आहेत. इथल्या काजूला मागणीही अधिक आहे. काजूच्या गराला दर अधिक मिळतो. यासाठी या भागातही काजूवर प्रक्रिया करणारे युनिट अधिक तयार झाले पाहिजेत. यामुळे स्थानिक तरुणांना स्वत:चा उद्योग उपलब्ध होणार आहे. काजूच्या युनिटमुळे महिलांनाही रोजगार मिळू शकतो. त्यामुळे या भागातील तरुणांनी काजूवर प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– रामचंद्र पाटील, काजू युनिट मालक.











