काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा बिहार दौऱ्यात आरोप
वृत्तसंस्था/ बस्तर
या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीसंदर्भात राज्यात राजकीय हालचाली वाढल्या असतानाच रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहारमधील बक्सर येथील दलसागर स्टेडियमवर आयोजित ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी संजद आणि भाजप युतीला संधीसाधू असे संबोधत निशाणा साधला. तसेच नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएसवर सूडाचे राजकारण केल्याचा आरोपही केला.
बक्सरमधील सभेला संबोधित करताना खर्गे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर अनेक आरोप केले. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपची युती संधीसाधू आहे. नितीश फक्त सत्तेसाठी वारंवार बाजू बदलतात. आताही ते केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी मोदींसोबत असल्याचे ते म्हणाले.
बिहारच्या जनतेने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला दिलेल्या 1.25 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? अशी विचारणा करावी असेही ते पुढे म्हणाले. तसेच यावेळी बिहारमधून एनडीए सरकार गेले पाहिजे असे सांगत या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन खर्गे यांनी जनतेला केले आहे.
भाजप-आरएसएसवर आरोप
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुर्बल घटकांच्या विरोधात असल्याचा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. ते जाती आणि धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडतात. हे लोक महिला, गरीब आणि मागासलेल्यांच्या हिताचा विचार करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. तसेच भाजप आणि संघाने समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून वक्फ दुरुस्ती विधेयक आणल्याचा आरोपही त्यांनी केला.









