सोन्याची बिस्किटं देखील जप्त
वृत्तसंस्था/ लुसाका
आफ्रिकेतील देश जाम्बियाच्या कस्टम अधिकाऱ्यांनी एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. तस्करीच्या आरोपात ही कारवाई झाली आहे. अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकाकडून अधिकाऱ्यांनी 23 लाख डॉलर्सपेक्षा (17 कोटी रुपये) अधिक रोख रक्कम आणि 5 लाख डॉलर्सच्या मूल्याचे सोने हस्तगत केले आहे. सोन्याची तस्करी करत दुबईला जात असलेल्या या भारतीयाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. केनेथ कौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई झाली आहे.
27 वर्षीय भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. दुबईला जाण्यासाठी केनेथ कौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा इसम पोहोचला होता. त्याच्या तपासणीत 23,20,00 डॉलर्स अन् सोन्याची बिस्किट्स आढळून आली. या सोन्याचे मूल्य सुमारे 5 लाख डॉलर्स असल्याचे ड्रग एन्फोर्समेंट कमिशनने सांगितले.
नोटांचे बंडल रबर बँडने बांधून एका काळ्या बॅगेत ठेवण्यात आले होते. यानंतर ही बॅग एका मोठ्या सुटकेसमध्ये टाकण्यात आली होती. याप्रकरणी तपास सुरु आहे. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्ह्यात सामील लोकांच्या विरोधात मोहीम राबवून त्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे ड्रग एन्फोर्समेंट कमिशनने सांगितले आहे.
जाम्बियामध्ये तांबे आणि सोन्यासारख्या खनिजांचे भांडार आहेत. अशा स्थितीत तेथे सोन्याच्या तस्करीचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. 2023 मध्ये जाम्बियामध्ये इजिप्तच्या 5 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जवळून 127 किलोग्रॅम सोने आणि 57 लाख डॉलर्सची रक्कम जप्त करण्यात आली होती.









