हजारो फूट खोदले तरी मिळेना पाणी, समस्या गंभीर
प्रतिनिधी/ बेळगाव
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर बनत चालला आहे. मानवासह पशु-पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. 850 ते 1000 फूट खोल कूपनलिका खोदूनदेखील पाणी पुरेशा प्रमाणात लागत नसल्याने भूजल पातळी घटल्याचे दिसून येत आहे.
भूजल पातळी कमी होत असल्याने शहर आणि ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न जटील होत चालला आहे. गेल्या चार वर्षांत शहर आणि ग्रामीण भागात 1 कोटीहून अधिक कूपनलिका कार्यरत आहेत. यापैकी 25 लाखाहून अधिक कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. 12 लाखांहून अधिक कूपनलिका 1200 फूट खोदूनही त्यांना पाणी मिळालेले नाही. भूगर्भातील पाणी दरवर्षी 100 फुटांनी कमी होत चालले आहे. अपेक्षीत प्रमाणात पाऊस न पडणे, तलाव आणि धरणांमध्ये पाणीसाठा न होणे, नदीचे पाणी सतत वाहून जाणे, तसेच 68 टक्के पाणी शेतीच्या कामासाठी वापरले जात आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिकांवरील अवलंबित्व हे या समस्येचे मूळ कारण असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी भूगर्भातील पाणी वाढविण्यासाठी आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सौंदत्ती, बैलहोंगल, गोकाक, मुडलगी, चिकोडी, खानापूर, बेळगाव, रायबागसह विविध तालुक्यांमध्ये 69 टक्के लोक पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी कूपनलिका आणि विहिरींवर अवलंबून आहेत. आधीच जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने आठवड्यातून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तर कूपनलिकांवर अवलंबून असलेल्या गावांना दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र कूपनलिकांमधील पाण्याची पातळी कमी होत असल्याने अपेक्षीत प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत नाही. पाण्याची खोली वाढत चालल्याने पाण्याची गुणवत्ताही खराब होत आहे. या सर्व कारणांमुळे नागरिकांसह पशु-पक्ष्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी धडपड करण्याची वेळ आली आहे.
भूजल वाढीसाठी शासनाकडून विशेष कार्यक्रम
उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने कोणतीही अडचण नाही. भूजल वाढीसाठी शासनाने विशेष कार्यक्रम आखला आहे.
– जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
जनतेने स्वेच्छेने पावसाचे पाणी साठवण्याला प्राधान्य द्यावे
जिल्ह्यात भूजल वाढीसाठी रोहयोअंतर्गत यापूर्वीच कामे हाती घेण्यात आली. तलाव आणि धरणांमध्ये पावसाच्या पाण्याचा साठा करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. जनतेने स्वेच्छेने पावसाचे पाणी साठवण्याला प्राधान्य द्यावे. काही ठिकाणी पाण्याची पातळी 1 हजार फुटांनी घसरली आहे.
– जि. पं. सीईओ राहुल शिंदे









