महापालिका आयुक्तांच्या न्यायालयात होणार सुनावणी
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या मालकीचे भाडेकरार संपलेले विविध ठिकाणचे गाळे ताब्यात घेण्यासाठी महापालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. चावी मार्केट येथील 19 गाळ्यांचा ताबा घेण्यासाठी महापालिकेकडून संबंधित भाडेकरूंना नोटीस बजावण्यात आली आहे. याविरोधात भाडेकरूंनीदेखील न्यायालयात स्थगिती मिळविल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सदर गाळ्यांबाबत महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्या न्यायालयात 22 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
महापालिकेचा आर्थिक स्त्रोत वाढावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. विकासकामे राबविण्यासाठी निधीची कमतरता भासत असल्याने विशेषकरून घरपट्टी वसुली, व्यापार परवाने, महापालिकेच्या खुल्या जागांचा भाडेकरारावर लिलाव करणे, आदी माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या मालकीचे बेळगाव शहर व उपनगरात विविध ठिकाणी गाळे आहेत. त्या गाळ्यांचा ताबा गेल्या अनेक वर्षांपासून भाडेकरुंकडे आहे.
भाडेकरार संपुष्टात आला तरी गाळ्यांचे हस्तांतर करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महापालिकेकडून गाळ्यांचा ताबा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. काही ठिकाणच्या गाळ्यांवर भाडेकरूंनी मालकीचा दावा केला आहे. तर अनेक वर्षांपासून गाळ्यांचा वापर करणाऱ्या भाडेकरूंनाच लिलाव प्रक्रियेत प्रथम प्राधान्य देण्यात यावे, यासाठी न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. न्यायालयानेही भाडेकरुंची बाजू उचलून धरत लिलाव प्रक्रियेत जुन्या भाडेकरूंना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असा आदेश दिला आहे. त्यामुळे महापालिकेची गोची झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच चावी मार्केट येथील 19 गाळ्यांचा भाडेकरार 2022 मध्ये संपुष्टात आला आहे. तरीदेखील भाडेकरू गाळ्यांचे हस्तांतर महापालिकेकडे करण्यास चालढकल करत आहेत. त्यामुळे याबाबत महापालिकेकडून भाडेकरूंना नोटीस बजावण्यात आली आहे.
या नोटिसीविरोधात न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली आहे. मात्र या प्रश्नावर महापालिका आयुक्त शुभा बी. यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या गाळ्यांसंदर्भात 22 एप्रिल रोजी मनपा आयुक्तांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. सदर सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.









