वृत्तसंस्था / दमाम (सौदी अरेबिया)
येथे नुकत्याच झालेल्या 18 वर्षांखालील वयोगटाच्या पुरुष आणि महिलांच्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण 11 पदकांची कमाई केली. भारतीय अॅथलिट्सनी या स्पर्धेत 1 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदके मिळविली.
कनिष्ट मुलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या हिमांशुने सुवर्णपदक मिळविताना 67.57 मी.चे अंतर नोंदविले. या क्रीडा प्रकारात चीनच्या हेओने 63.45 मी. चे अंतर नोंदवित रौप्य तर उझबेकच्या सेडुलेव्हने 61.96 मी.चे अंतर नोंदवित कांस्य पदक घेतले. मुलांच्या 5 हजार मी. चालण्याच्या शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ताने रौप्य पदक पटकाविले. मुलींच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या तनुने रौप्य पदक मिळविताना 57.63 सेकंदाचा अवधी घेतला. भारताच्या निश्चयने मुलांच्या गोळाफेकमध्ये रौप्य पदक तर थाळीफेकमध्ये कांस्यपदक घेतले. भारताची धावपटू आरतीने 100 मी. आणि 200 मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदके मिळविली. मुलांच्या उंचउडी प्रकारात देवक भूषणने रौप्य पदक घेतले. मुलांच्या मिडले रिलेमध्ये भारताने रौप्य पदक पटकाविले. 2023 साली झालेल्या 18 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 6 सुवर्ण, 11 रौप्य आणि 7 कांस्य पदकांची कमाई केली होती.









