वृत्तसंस्था / मॉस्को
युव्रेनशी होत असलेल्या युद्धात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इस्टरसाठी तात्पुरती युद्धबंदी घोषित केली आहे. ही युद्धबंदी त्यांनी एकतर्फी घोषित केली असून या निर्णयावर अद्याप युक्रेनने आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. युव्रेनही रशियाचे अनुकरण करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तथापि, आपल्या सैन्याधिकाऱ्यांनी त्यांनी सीमेवर सज्ज राहण्याची सूचना केली आहे. युक्रेनने जर युद्धबंदीचा भंग केला आणि रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर रशियाचे सैनिकही युक्रेनवर मोठा हल्ला चढवितील, असा इशारा त्यांनी दिला आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने रशिया-युव्रेन संघर्षातून स्वत:ला मुक्त करण्याचे संकेत दिले होते. पुढच्या दोन आठवड्यांमध्ये जर संघर्ष थांबला नाही, तर अमेरिका या संघर्षात लक्ष घालणार नाही. पुढे याचा परिणाम जो होईल, तो रशिया आणि युक्रेन यांनी पहावा, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिकेने केले होते. त्यानंतर आता रशियाने इस्टरसाठी युद्धबंदी घोषित केली आहे. युक्रेनही रशियाचे अनुकरण करुन हल्ले थांबवेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.









