वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील सीलमपूर भागात एका 17 वर्षीय तरुणाची गुरुवारी रात्री चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि स्थानिक लोकांनी रस्ता रोखून घटनेचा निषेध नोंदवला. या हत्येला जातीय स्वरुप प्राप्त झाल्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जुन्या वैमनस्यातून मुस्लीम मुलांनी ही हत्या केल्याचा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे, सीलमपूरमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी आपल्या घराबाहेर हिंदू समुदाय धोक्यात असल्यासंबंधीचे पोस्टर्स लावले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना मदतीसाठी आवाहन केले आहे.
चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो न्यू सीलमपूर येथील जे ब्लॉकचा रहिवासी होता. सीलमपूर पोली ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांच्या शोधात अनेक पथके गुंतली आहेत. घटनेमागील कारण सध्या स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी केली जात आहे.









