विश्व हिंदू परिषदेकडून त्याचे स्वागत आणि कौतुक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ाढरणाऱ्यांपैकी एक असणारा महेंद्र हेम्ब्राम याची 25 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगल्यानंतर कारागृहातून सुटका झाली आहे. आपल्या शिक्षाकाळात त्याने दाखविलेल्या सद्वर्तनाचा लाभ होऊन त्याची कारागृहातून सुटका झाली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तो कारागृहाबाहेर आल्यानंतर त्याचे विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदू संघटनांकडून भव्य स्वागत करण्यात आले. हा आमच्यासाठी शुभदिन आहे. हेम्ब्राम हा आमचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. तो आता पुन्हा आमच्यात आला, याचा आम्हाला निश्चितच आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया हिंदू संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केली. दारा सिंग नामक मुख्य आरोपीचा तो साहाय्यक होता.
प्रकरण काय आहे…
हे ओडीशातील प्रकरण आहे. ओडीशात वनवासी भागात काम करण्यासाठी ग्रॅहॅम स्टेन्स आपल्या कुटुंबासह भारतात आला होता. त्याच्या सेवाकार्य करणाऱ्या संस्था होत्या. तथापि, तो सेवाकार्याच्या आडून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचे काम करत होता, असा त्याच्यावर आरोप होता. हे ग्रॅहेम स्टेन्स आपल्या गाडीत आपल्या दोन मुलांसह झोपले असताना त्यांची गाडी पेटवून देण्यात आली होती. या आगीत स्टेन्स त्यांच्या दोन्ही अपत्यांसह 1999 मध्ये प्राणांस मुकले होते.
आरोप बजरंग दलावर
या जळीत प्रकरणाचा आरोप बजरंग दलावर करण्यात आला होता. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. दारा सिंग हा या प्रकरणातला प्रमुख आरोपी होता. तर महेंद्र हेम्ब्राम हा त्याचा सहकारी असल्याने त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांनी आपल्यावरील आरोप नाकारले होते. तथापि, त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली होती.
मी निर्दोष आहे…
कारागृहातून बाहेर आल्यानंतर हेम्ब्राम याने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आपल्याला या प्रकरणात खोटे पुरावे दाखवून गोवण्यात आले होते. स्टेन्स याची हत्या धर्मांतराच्या प्रकरणातून झाली होती. माझा या हत्येत कोणताही सहभाग नव्हता. हत्या झाली तेव्हा मी त्या स्थानाच्या जवळपाससुद्धा नव्हतो. तथापि, आपल्या विनाकारण 25 वर्षे कारागृहात शिक्षा भोगावी लागली. आता माझी सुटक झाली आहे, ही आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.
हत्या केव्हा झाली…
ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्यांची दोन अपत्ये यांची हत्या 21 जानेवारी 1999 च्या रात्री ओडीशाच्या केओंझार जिल्ह्याच्या मनोहरपूर गावातील एका चर्चच्या बाहेर झाली. चर्चच्या बाहेर काही अंतरावर हे तिघेही त्यांच्या गाडीत झोपले होते. तेव्हा रात्रीच्या वेळी या गाडीवर अचानकपणे काही युवकांनी हल्ला करुन गाडीला आग लावली होती. या आगीत होरपळून या तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात 14 आरोपींच्या विरोधात अभियोग सादर करण्यात आला होता. त्यांच्यापैकी 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. तर दारा सिंग आणि महेंद्र हेम्ब्राम यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दारा सिंग अद्यापही शिक्षा भोगत आहे. त्याने 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांच्याकडे दयेसाठी आवेदन केले होते. मात्र, तो अद्याप कारागृहात आहे.









