महसूल निरीक्षकांचा कारभार : अर्थ-कर स्थायी समिती बैठकीत अधिकारी धारेवर
बेळगाव : ई-आस्थी प्रणालीअंतर्गत शहरातील मिळकतींची नोंद करून घेऊन ए आणि बी खात्यांचे वितरण केले जात आहे. मात्र नगरसेवकांनी दिलेली कामे बाजूला ठेवून एजंटांकडून आलेल्या फाईलींना तातडीने मंजुरी दिली जात आहे. चक्क एका नगरसेवकाची फाईल तब्बल सात महिन्यांपासून तशीच पडून आहे. त्यामुळे याचे कारण काय? नगरसेवकांची कामे न करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे का?, तसे असल्यास आपली भूमिका स्पष्ट करावी. एजंटांकडून येणारी कामे तातडीने होत असल्यामुळे महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार? असे प्रश्न विचारत विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी यांनी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी आणि महसूल निरीक्षकांना चांगलेच घेरले. राज्य सरकारच्या सूचनेनुसार शहर व उपनगरातील मिळकतींची ई-आस्थी प्रणालीअंतर्गत नोंद करून घेतली जात आहे.
आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर मिळकतींना ए आणि बी खात्याचे वितरण केले जात आहे. सध्या विविध प्रभागांमध्ये अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र महसूल अधिकारी नागरिकांची कामे करून देण्यास विलंब धोरण अवलंबत आहेत. नगरसेवकांनी दिलेली कामे करून देण्यास चालढकल केली जात आहे. मात्र तेच काम एखाद्या एजंटाकरवी दिल्यास तातडीने कामे करून दिली जात आहेत. त्यामुळे नगरसेवकांची कामे करून न देण्याबाबत अघोषित निर्णय घेण्यात आला आहे का? अशी विचारणा करण्यात आली. एका नगरसेवकाच्या मिळकतीची फाईल गेल्या सात महिन्यांपासून महसूल निरीक्षकांकडे पडून आहे. घरपट्टी भरण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र नगरसेवकाच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्याची फाईल एजंटामार्फत दिल्यानंतर 15 दिवसांत त्या मिळकतीची नोंद करून घेण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांना ‘किती पैसे सांगा देतो’ अशी म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला.
फाईल महापालिकेतून गायब
एका प्रभागात एकाच मिळकतीला दोन पीआयडी क्रमांक देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. याबाबत महसूल निरीक्षकानेही दुजोरा दिल्याने चौकशी करून अहवाल देण्याची सूचना महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी संतोष आनिशेट्टर यांना दिली. एकाच मिळकतीला दोन पीआयडी क्रमांक देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने हे प्रकरण अंगलट येईल, या भीतीने सदर फाईलही महापालिकेतून गायब करण्यात आल्याचा आरोप केला. याबाबत संबंधित महसूल निरीक्षकाला अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता फाईल गायब झाली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या गंभीर विषयाबाबत कोणता निर्णय घेणार हे मात्र पहावे लागणार आहे. महसूल विभागात मनुष्यबळ कमी असून सध्या उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण अधिक आहे, असे महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी बैठकीत सांगितले.
जाहिरात फलक, लक्ष्मी मार्केटच्या विषयांवर चर्चा : 20 कॅन्टीलिव्हरसह 4 गॅलरींचाही ताबा घेणार
शहरातील जाहिरात फलकांचा विषय महापालिकेतील अर्थ व कर स्थायी समितीत चांगलाच गाजला. कॅन्टीलिव्हर आणि गॅलरी जाहिरातीचा कॉसमॉस एजन्सीचा ठेका 6 मे 2025 रोजी संपणार असल्याने 5 मे रोजीच संबंधित एजन्सीकडे असलेल्या 20 कॅन्टीलिव्हर आणि 4 गॅलरींचा ताबा घेण्यात यावा, अशी सूचना महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी महसूल अधिकारी व निरीक्षकांना केली. त्याचबरोबर लक्ष्मी मार्केटचा वापर बेकायदा प्रकारासाठी केला जात असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी यांनी बैठकीत केली. त्यामुळे सदर जागेचा सर्व्हे करून त्याठिकाणी महापालिकेचा फलक लावण्याचा निर्णय झाला.
यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत शहरातील जाहिरात फलकांचा विषय गाजला होता. जाहिरात फलकांच्या माध्यमातून महापालिकेला कोणत्याच प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने ग्राऊंड रेंट स्वीकारण्याबाबत चर्चा झाली. शहरातील 20 कॅन्टीलिव्हर आणि चार प्रेक्षक गॅलरींचा ठेका कॉसमॉस एजन्सीने घेतला आहे. त्यामुळे संबंधित एजन्सीचा ठेका संपताच महापालिकेने त्या कॅन्टीलिव्हर आणि गॅलरींचा ताबा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी 6 मे 2025 रोजी ठेकेदाराच्या ठेक्याची मुदत संपणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 2022 मध्ये याबाबत लिलाव झाला असला तरी हस्तांतराची प्रक्रिया विलंबाने झाली आहे. ठेका संपताच संबंधित एजन्सीकडे असलेले कॅन्टीलिव्हर आणि गॅलरींचा ताबा घेण्यात यावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यामुळे महसूल अधिकारी व निरीक्षकांनी 5 मे रोजीच ताबा घेण्याची तयारी करावी. यासाठी जीपीएस फोटो आणि पंचनामा करावा, अशी सूचना महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी केली.
त्याचबरोबर महापालिकेच्या मालकीच्या लक्ष्मी मार्केटच्या जागेचा अवैध प्रकारांसाठी वापर केला जात आहे. सदर जागा आपल्या प्रभागात येत असून यामुळे महापालिकेचे नुकसान होण्याबरोबरच बदनामीही होत आहे. त्यामुळे या जागेसंदर्भात अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी यांनी केली. त्यावर तातडीने सर्व्हे करून त्याठिकाणी महापालिकेच्या मालकीचा फलक लावण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.









