प्रवेशाला प्रारंभ : कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, मेकॅट्रॉनिक्स विभाग
खानापूर : लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक तसेच दै. तरुण भारतचे सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून खानापूर येथे लोकमान्य एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून व्ही. वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. ही माहिती लोकमान्यचे उपाध्यक्ष पंढरी परब, प्रशासक डी. एन. मिसाळे, सचिव सत्यव्रत नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी वागळे महाविद्यालयाच्या प्राचार्या शरयू कदम आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चव्हाण उपस्थित होते. सत्यव्रत नाईक यांनी स्वागत केले. पंढरी परब यांनी लोकमान्य संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक बाबुराव ठाकुर यांच्या दूरदृष्टी विचारांतून सुरू केलेल्या बेळगाव एज्युकेशन समितीच्या माध्यमातून शालेय शिक्षणाचा पाया घातला. याच पायावर लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर सामाजिक बांधिलकी जपत लोकमान्य संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित आहेत. यात शिक्षण, वैद्यकीय सेवा, सामाजिक उपक्रम यांचा समावेश आहे. लोकमान्य सोसायटीचे जाळे शहर-ग्रामीण भागात पसरून आर्थिक चळवळ उभारली आहे. यात 5000 कर्मचारी व 15000 सहकर्मचारी कार्यरत आहेत.
खानापूर तालुक्यातील जांबोटी या दुर्गम भागात बाबुराव ठाकुर यांच्या नावे महाविद्यालय सुरू केले आहे. खानापुरातही महाविद्यालय कार्यरत आहे. बेळगाव येथे ज्ञान प्रबोधिनीसारखे दर्जेदार शिक्षण देणारी शाळा सुरू केली आहे. खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची सोय व्हावी या दूरदृष्टीच्या विचारातून अद्ययावत सुसज्ज तांत्रिक महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळविली आहे. माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण यांच्या नावे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. यात पाच विभाग असून 400 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय होणार असल्याचे पंढरी परब यांनी सांगितले. व्ही. वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालयाची माहिती देताना प्रशासक डी. एन. मिसाळे म्हणाले, बाबुराव ठाकुर यांच्या प्रेरणेतून आणि तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचावी हा उद्देश ठेवून खानापूरसारख्या दुर्गम भागात पहिले तांत्रिक महाविद्यालय सुरू करण्याचे धाडस डॉ. किरण ठाकुर यांनी केले आहे. तालुक्यातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असूनही परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. मात्र, आता खानापूर शहरात पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केले आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, मेकॅट्रॉनिक्स, हे चार तांत्रिक शिक्षण विभाग सुरू करण्यात येणार आहेत.
याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे. येत्या अकॅडमिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. यासाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी उच्चशिक्षित तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे प्राध्यापक वर्ग नेमण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना सुसज्ज लॅबोरेटरी, लायब्ररी तसेच कॉम्प्युटर लायब्ररी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुक्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमाद्वारे प्रवेश शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार आहेत. येत्या काही वर्षात सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. या महाविद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून इतर विभागही सुरू होणार आहेत. यावर्षीपासूनच तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्dया कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. तालुक्यातील व इतर भागातील दहावी पास व बारावी पास-नापास विद्यार्थ्यांनी व्ही. वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रवेश प्रक्रिया सुरू
खानापुरात प्रथमच तांत्रिक महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या तांत्रिक विभागांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक महाविद्यालयाच्या येत्या अकॅडमिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांनी लोकमान्य संचालित व्ही. वाय.चव्हाण पोलिटेक्निक कॉलेजशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









