जिल्ह्यातील कालव्यांची स्थिती, ‘पाटबंधारे विभागाने लक्ष देण्याची गरज
बेळगाव : सीमेवरील जिल्हा बेळगावमधील शेतकऱ्यांना जलसिंचनाची सोय करून देण्यासाठी जिल्ह्यात कालवे बांधण्यात आले आहेत. या कालव्याद्वारे शेतीला पाणी उपलब्ध होत असले तरी या ना त्या कारणाने शेतीला पूरक पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कालव्याच्या सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत येणाऱ्या गावातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाटबंधारे खात्याचे प्रयत्न असले तरी कालवे गाळ, काटेकुटे, टाकाऊ वस्तू यांनी भरलेले असल्याने पाण्याचा प्रवाह कालव्यांमधून योग्यरितीने होत नाही. त्यामुळे शेतीला पाणी वेळीच आणि पुरेसे उपलब्ध होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने मलप्रभा व घटप्रभा नदीच्या पाण्याचा शेतीसह अन्य उद्योगधंद्यांसाठी कालव्यामार्फत उपयोग करण्यात येत असतो. मलप्रभा उजवा व डाव्या कालव्यांतर्गत 4 लाख 84 हजार 653 एकर शेतजमिनीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा पाटबंधारे खात्याचा उद्देश असला तरी या प्रमाणातील शेतीला ते उपलब्ध होत नाही. सुमारे 1 लाख 25 हजार 58 एकर जमिनीला पाणी उपलब्ध होत नाही. कालव्यांची स्वच्छता, देखभाल योग्यरितीने होत नसल्याने शेतीला पाणी उपलब्ध होत नाही, अशी या शेतकऱ्यांची तक्रार आहे.
जलाशयापासून मुख्य कालवा, उपकालव्यामार्फत शेतवडीला पाणीपुरवठा करण्यात येत असतो. मात्र काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कालव्यांची दुरवस्था झाली आहे. काँक्रिट कोसळणे, गेट आणि कालव्याच्या बाजूच्या भिंतीचे दगड कालव्यात कोसळल्यामुळे पाणी वाहण्याला अडथळा निर्माण होतो. काही भागात कालव्यांमध्ये काटेकुटे, झुडुपे अडकलेली असून यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येत असतो. पाटबंधारे खात्याने कालव्यांची वेळोवेळी देखभाल घेतल्यास शेतीला वेळीच व पूरक पाणी निश्चित मिळू शकेल, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
कालवे नादुरुस्त होण्याची कारणे
पाटबंधारे खात्याकडून कालव्यांची देखभाल न होणे, कालव्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कालव्यांना लागलेली गळती, कालव्यांमध्ये दगड, काटेकुटे, टाकाऊ वस्तू पडले असल्यामुळे प्रवाहात येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांनी मनमानीपणे कालवे फोडून शेतीला वापरलेले पाणी, कालवे जाणाऱ्या मार्गावर आवश्यक ठिकाणी लहान सेतू उभारण्यात न आल्याने शेतीला पूरक पाणी उपलब्ध होत नाही. मागील वर्षी जिल्ह्यात पाऊस मुबलक झाला असल्याने नद्यांना पाणी आहे. त्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध करून देणे पाटबंधारे खात्याला कोणतीही समस्या नाही. कालव्यांची स्वच्छता करून शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीने सध्या जोर धरला आहे.









