सुपर ओव्हरच्या थरारात दिल्लीची राजस्थानवर मात : मिचेल स्टार्क ठरला किमयागार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीने 5 विकेट गमावल्यानंतर 188 धावा केल्या. राजस्थानलाही 4 विकेट गमावून फक्त 188 धावा करता आल्या. मिचेल स्टार्कने 20 व्या षटकात शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांच्याविरुद्ध 9 धावांचा बचाव करून सामना बरोबरीत आणला. सुपरओव्हरच्या थरारामध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 11 धावा केल्या. दिल्लीकडून केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी संदीप शर्माविरुद्ध 4 चेंडूत लक्ष्य गाठले. 
दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 189 धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी 34 चेंडूत 61 धावांची सलामी दिली. विपराज निगमच्या षटकात चौकार, षटकार खेचल्यानंतर संजूला दुखापतीचा त्रास जाणवला. यामुळे संजू रिटायर हर्ट झाला. यानंतर रियान परागला अक्षर पटेलने त्रिफळाचीत केले. जैस्वालने मात्र शानदार अर्धशतकी खेळी साकारली. तो 37 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 51 धावांची खेळी करून बाद झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर नितीश राणाने सामन्याची सूत्रे हाती घेतली. सातत्याने चौकार, षटकारांची लूट करत नितीनने धावगतीचे आव्हान नियंत्रणात ठेवले. नितीशला बाद करत स्टार्कने राजस्थानला धक्का दिला. मोहित शर्माने टाकलेल्या 19व्या षटकात राजस्थानने 14 धावा काढल्या. शेवटच्या षटकात राजस्थानला 9 धावांची आवश्यकता होती. मात्र मिचेल स्टार्कच्या शानदार गोलंदाजीसमोर शिमोरन हेटमायर आणि ध्रुव जुरेल जोडीला चौंकार किंवा षटकार मारता आला नाही. शेवटच्या चेंडूवर राजस्थानला दोन धावांची आवश्यकता होती. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ध्रुव जुरेल रनआऊट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
प्रारंभी, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जेक फ्रेझर मॅकगर्क या लढतीतही चुकीचा फटका खेळून बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या करुण नायरला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर अभिषेक पोरेल आणि के.एल. राहुल यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. जोफ्रा आर्चरने राहुलला बाद करत ही जोडी फोडली. त्याने 32 चेंडूत 38 धावांची खेळी केली. थोड्याच वेळात अभिषेक पोरेलही तंबूत परतला. वानिंदू हासारंगाने त्याला बाद केले. त्याचं अर्धशतक एका धावेने हुकलं. कर्णधार अक्षर पटेलने ट्रिस्टन स्टब्जला साथीला घेत पाचव्या विकेटसाठी 19 चेंडूत 41 धावांची भागीदारी केली. अक्षर 14 चेंडूत 34 धावा. करुन बाद झाला. यानंतर स्टब्जला आशुतोष शर्माची साथ मिळाली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 19 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. या दोन भागीदाऱ्यांच्या बळावर दिल्लीने राजस्थानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 5 बाद 188 (मॅकगर्क 9, अभिषेक पोरेल 49, केएल राहुल 38, ट्रिस्टन स्टब्ज नाबाद 34, अक्षर पटेल 34, आशुतोष शर्मा नाबाद 15, जोफ्रा आर्चर 2 बळी, थिक्षणा व हसरंगा प्रत्येकी 1 बळी)
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 4 बाद 188 (यशस्वी जैस्वाल 51, संजू सॅमसन रिटायर्ड 31, नितीश राणा 51, ध्रुव जुरेल 26, हेटमायर नाबाद 15, मिचेल स्टार्क, अक्षर पटेल व कुलदीप यादव प्रत्येकी एक बळी)
सुपरओव्हरचा थरार
सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांचे लक्ष्य दिले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 11 धावा केल्या. शिमरन हेटमायरने 4 चेंडूत 6 धावा केल्या. 2 चेंडूत 4 धावा काढल्यानंतर रियान पराग धावबाद झाला. यशस्वी जयस्वाल खाते न उघडताच धावबाद झाला. सामना जिंकण्यासाठी दिल्लीला 6 चेंडूत 12 धावांची गरज होती. दिल्लीसाठी सुपर ओव्हरमध्ये केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स फलंदाजीसाठी मैदानात उतरले. वेगवान गोलंदाज संदीप शर्माच्या पहिल्याच चेंडूवर राहुलने 2 धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने उत्कृष्ट चौकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर राहुलने 1 धाव घेतली आणि स्ट्राईक स्टब्सकडे दिली. स्टब्सने आक्रमक अंदाजात शानदार षटकार ठोकत दिल्लीला दमदार विजय मिळवून दिला.









