स्वत:च्या डोक्यावरील सर्व केस मोजल्याचा दावा एका इसमाने केला आहे. डोक्यावरील सर्व केस मोजण्यासाठी त्याला पूर्ण 5 दिवस लागले आहेत. तरीही त्याचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद होऊ शकले नाही. या इसमाने स्वत:च्या डोक्यारवील सर्व केस मोजण्याचा निर्णय घेतला होता. इन्स्टाग्रामवर या इसमाने एक व्हिडिओ पोस्ट केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पूर्ण पाच दिवस स्वत:च्या डोक्यावरील प्रत्येक केस मोजण्यात घालविल्याचे सांगताना हा इसम दिसून येतो. स्वत:च्या डोक्यावरील केस मोजणारा मी पहिलाच व्यक्ती असल्याचा दावा त्याने केला आहे. परंतु तरीही त्याला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळालेले नाही. इन्स्टाग्रामवर कंट्रीमॅन नावाने प्रसिद्ध या इसमाने स्वत:चे मुंडन करून घेत प्रत्येक केस मोजण्याचा निर्णय घेतला.
सर्वप्रथम त्याने स्वत:च्या केसांना ओले केले, मग ट्रिमरच्या मदतीने पूर्ण मुंडन करविले, त्याने लक्षपूर्वक कोसळलेले सर्व केस जमा केले आणि त्यांना मोजण्यास सुरुवात केली. हिशेब ठेवण्यासाठी त्याने दगडांचा वापर एक तात्पुरते मोजणी उपकरणाच्या स्वरुपात केला. प्रत्येक हजार केसांसाठी त्याने एका प्लेटमध्ये एक दगड ठेवला, जेणेकरून अंतिम संख्या मोजण्यास मदत मिळू शकेल. दुसऱ्या दिवशी यापूर्वी कुणीच असे करण्याचा प्रयत्न केला नसल्याची जाणीव त्याला झाली. यानंतर त्याने लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स आणि गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स दोघांनाही ईमेल पाठविले आणि पुन्हा मोजणी सुरू केली. त्यानुसार त्याला या मिशनवर प्रतिदिन 10-12 तास घालवावे लागले आहेत.
या कारणामुळे झाला नाही विश्वविक्रम
पाचव्या दिवशी त्याला अखेर उत्तर मिळाले. त्यानुसार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याची विनंती फेटाळली होती. तर गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याच्या अर्जावर विचार करण्यासाठी 1200 डॉलर्सचे शुल्क मागितले. पैसे देण्यास तयार नसल्याने त्याने विश्वविक्रम निर्माण करण्याचा विचार सोडून दिला.
डोक्यावर होते 91300 केस
अखेरीस त्याने 91 दगड मोजले, जे त्याच्या गणितानुसार त्याच्या डोक्यावर 91,300 केसांसमान होते. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून याला 14 दशलक्षापेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. तसेच सोशल मीडिया युजर्सना तो पसंत पडला आहे.









