रोमांचक सामन्यात पंजाबचा केकेआरवर 16 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ मुल्लनपूर (चंदीगड)
पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला 16 धावांनी पराभूत करत अनोखी कामगिरी केली. 111 एवढ्या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना कोलता नाईट रायडर्सला 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कोलकाताचा संघ 95 धावांवर बाद झाला. केकेआरला अजिंक्य रहाणे व रघुवंशी यांनी 55 धावांच्या भागीदारीने सावरले होते. पण चहल गोलंदाजीला आला अन् सामना फिरला. त्याने 28 धावांत 4 विकेट घेत पंजाबला अशक्यप्राय असा विजय मिळवून दिला.
112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खूपच खराब झाली. दोन्ही सलामीवीर 7 धावांवर बाद झाले. क्विंटन डी कॉक 2 धावा काढून बाद झाला आणि सुनील नरेन फक्त 5 धावा करता आल्या. या कमी धावसंख्येच्या सामन्यात, अंगक्रिश रघुवंशी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी 55 धावांची भागीदारी करून केकेआरच्या विजयाच्या शक्यता वाढवल्या. यावेळी केकेआरने 3 गडी गमावत 62 धावा केल्या होत्या.
चहलचा चक्रव्यूह
रहाणे 17 धावा काढून माघारी परतला तर रघुवंशीने सर्वाधिक 37 धावांचे योगदान दिले. रघुवंशीला चहलने बाद पंजाबला मोठे यश मिळवून दिले. यांनतर केकेआरने अवघ्या 7 धावांत 5 विकेट गमावल्या. यादरम्यान अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, रमणदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्या विकेट्स पडल्या. व्यंकटेशने फक्त 7 धावा केल्या आणि रिंकू सिंग, ज्याची मोठी धावसंख्या अपेक्षित होती, तो फक्त 2 धावा करून बाद झाला. रसेलने 17 धावांची खेळी साकारली पण तो ही यान्सेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर केकेआरचा डाव 15.1 षटकांत 95 धावांत आटोपला. चहलने 28 धावांत 4 बळी घेत केकेआरच्या फलंदजीचे कंबरडे मोडले तर यान्सेनने 3 बळी घेत त्याला मोलाची साथ दिली.
घरच्या मैदानावर पंजाबचा संघ ऑलआऊट
पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यरने केकआरविरुद्ध टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. पंजाबच्या फलंदाजांना संपूर्ण 20 ओव्हर देखील फलंदाजी करता आली नाही. पंजाबचा संघ 15.3 ओव्हरमध्ये 111 धावांत ऑलआऊट झाला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 30 धावा फटकावल्या तर प्रियांश आर्यने 22 धावा केल्या. चांगल्या सुरुवातीनंतर पंजाबला हर्षित राणाने एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले, त्यातून पंजाबचा संघ सावरला नाही. हर्षित राणाने प्रियांश आर्य आणि श्रेयस अय्यरला बाद केले. यानंतर पंजाबचे इतर फलंदाज वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनच्या गोलंदाजीपुढं टिकाव धरु शकले नाहीत. यामुळं पंजाबचा संघ 111 धावांवर बाद झाला. केकेआरकडून हर्षित राणाने 3 तर सुनील नरेन, वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स 15.3 षटकांत सर्वबाद 111 (प्रियांश आर्या 22, प्रभसिमरन सिंग 30, नेहाल वढेरा 10, शशांक सिंग 18, हर्षित राणा 3 बळी, वरुण चक्रवर्ती व सुनील नरेन प्रत्येकी दोन बळी)
केकेआर 15.1 षटकांत सर्वबाद 95 (अजिंक्य रहाणे 17, रघुवंशी 37, आंद्रे रसेल 17, चहल 28 धावांत 4 बळी, यान्सेन 17 धावांत 3 बळी, मॅक्सवेल, अर्शदीप प्रत्येकी एक बळी).









