दोन तोळे सोने-चांदीसह रोख रक्कम लांबविली
वार्ताहर/उचगाव
गोजगे येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी धाडसी चोरी केली असून सलग दोन दिवस चोरी झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये जवळपास तीन लाखाची चोरी झाल्याचे समजते. गणपत गल्ली, गोजगे येथील विनोद यल्लाप्पा होनगेकर यांची आई आजारी असल्याने ते केएलई हॉस्पिटलमध्ये होते. घराला कुलूप असल्याने रात्री चोरांनी कुलूप तोडून दोन तोळे सोने, चांदी आणि दहा हजार रुपये रोख रक्कम लांबविली. रविवारी कलमेश्वर मंदिरमध्ये चोरी झाली होती. लागलीच त्याच रात्री गावातील घरामध्ये घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याने भीती पसरली आहे. चोरीचा तपास तातडीने लावावा, अशी मागणी होत आहे.









