वृत्तसंस्था / दिल्ली
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा कर्णधार अक्षर पटेलला 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
रविवारी येथील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळविला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत या स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदविला होता. मात्र सलग चार विजयानंतर दिल्लीला घरच्या मैदानावर पहिला पराभव स्वीकारावा लागला होता. आयपीएलच्या नियमानुसार कर्णधार पटेलला हा दंड करण्यात आला आहे. दिल्ली संघाकडून या स्पर्धेत अशा तऱ्हेचा पहिलाच गुन्हा नोंदविला गेला आहे.









