मुर्शिदाबादनंतर 24 परगाणा जिल्ह्यातही हिंसाचार
वृत्तसंस्था / कोलकाता
वक्फ कायद्याविरोधात दंगलखोरांनी पश्चिम बंगालच्या आणखी एका जिल्ह्यात हिंसाचाराला प्रारंभ केला आहे. मुर्शिदाबाद आणि माल्दा जिल्ह्यांच्या नंतर आता दक्षिण 24 परगाणा जिल्ह्यात आगडोंब उसळला आहे. शेकडो खासगी वाहनांना धर्मांध दंगलखोरांनी आगी लावल्या असून प्रशासनाची हतबलता स्पष्ट होत आहे.
या जिल्ह्यात दंगलखोरांनी पोलिसांनाही लक्ष्य केले असून एक पोलिस व्हॅन आगीत नष्ट करण्यात आली आहे. या जिल्ह्याच्या भांगर या भागात हिंसाचाराचा जोर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. अनेक पोलिस दंगलखोरांच्या दगडफेकीत आणि मारहाणीत जखमी झाले आहेत. नव्या हिंसाचाराच्या संदर्भात 2 जणांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये 300 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. हा हिंसाचार सेक्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने घडविल्या असल्याचा आरोप केला जात आहे.
कोलकत्यातही तणाव
सेक्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्येही तणाव निर्माण केला आहे. या संघटनेचे कार्यकर्ते शहरातील रामलीला मैदानात जात असताना त्यांनी मार्गांवर उभ्या असणाऱ्या पोलिसांवर दगडफेक केली. या मैदानावर वक्फ कायद्याविरोधात सभा घेण्यात येणार होती. या संघटनेचे आमदार नौशाद सिद्दिकी हे या सभेत भाषण करणार होते. तथापि, पोलिसांनी या सभेला अनुमती नाकारल्याने पोलिसांवर हल्ला करण्यात आला. अनुमती नसतानाही या मैदानावर सभा घेण्यात आली, अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुर्शिदाबाद तुलनेने शांत
मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी तुलनेने शांतता दिसून आली. हिंसाचाराची कोणतीही मोठी घटना घडली नाही. तथापि, जिल्ह्यात इंटरनेट सेवा आणखी काही काळ बंदच राहणार आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले असून अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याच जिल्ह्यात गेल्या आठवड्यात वक्फ कायद्याविरोधातील दंगलींमध्ये 3 हिंदूंचा बळी घेण्यात आला होता. त्यांना त्यांच्या घरातून बाहेर खेचून त्यांची हत्या करण्यात आली होती. याच घटनेत अनेकजण जखमीही झाले होते. जखमी झालेल्यांमध्ये काही पोलिसांचाही समावेश होता. माल्दा जिल्ह्यातील हिंसाचार आता बऱ्याच प्रमाणात शमला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हजारो हिंदूंचे पलायन
मुर्शिदाबाद जिल्ह्यातून हजारो हिंदूंनी हिंसाचाराच्या भीतीने पलायन केले आहे. अनेक हिंदू नौकांच्या साहाय्याने गंगा नदी ओलांडून पलिकडच्या माल्दा जिल्ह्यात पोहचलेले आहेत. तेथे त्यांनी शाळा आणि अन्य सार्वजनिक इमारतींमध्ये आश्रय घेतला आहे. दंगलखोर धर्मांधांकडून आम्हाला घरे सोडण्यासाठी धमक्या येत आहेत, अशा हजारो तक्रारी स्थानिकांनी पोलिसांकडे केल्या असल्याचे वृत्त आहे.









