वृत्तसंस्था/ पाटणा
राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (आरएलजेपी) नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी सोमवारी एनडीएसोबतची युती तोडण्याची घोषणा केली. आपल्या पक्षाचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) कोणताही संबंध राहणार नाही, असे त्यांनी सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले. आजपासून आपला पक्ष एनडीएपासून वेगळा होत आहे. आता आपण बिहारमधील सर्व 243 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार असून वेळोवेळी अधिक माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी बिहार सरकार दलितविरोधी असल्याचाही हल्लाबोल केला.
पशुपती पारस यांच्या नव्या पवित्र्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान विरुद्ध पशुपती पारस यांच्या लढाईत पुतण्याने काकांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या साथीने चिराग पासवान यांना राज्यातील 5 जागा मिळाल्या होत्या. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानुसार विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली दिसत आहे. निवडणुकीचे वर्ष पाहता यावेळी संविधान निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती सर्व पक्षांसाठी खूप महत्त्वाची होती. आंबेडकर जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांद्वारे सर्व पक्ष दलितांचे हितचिंतक बनण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष जेडीयूने एक दिवस आधी ‘भीम संवाद’ हा कार्यक्रम आयोजित करून आपली ताकद दाखवून दिली. तर, राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाकडून सोमवारी बापू सभागृहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.









