बेळगाव : दहावी उत्तरपत्रिका तपासणीला मंगळवार दि. 15 पासून प्रारंभ होणार आहे. बेळगाव शहरातील आठ केंद्रांवर पेपर तपासणी करण्यात येणार असून यासाठी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तरपत्रिकांचे डि-कोडींग करून त्या तपासणीसाठी केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत. 21 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 34 हजार 894 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये बेळगाव शहरातील 9 हजार 114, बेळगाव ग्रामीणमधील 5 हजार 754 तर खानापूरमध्ये 3 हजार 883 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आठवडाभराच्या कालावधीनंतर पेपर तपासणी करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 15 रोजी उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांवर सर्व तपासणीकांना वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील सेंट पॉल्स, सेंट झेवियर, उषाताई गोगटे, शिवबसवनगर येथील सिद्धरामेश्वर शाळा, सरकारी माध्यमिक शाळा महांतेशनगर व सेंट अँथनी स्कूल येथे उत्तरपत्रिका तपासणी करण्यात येणार आहे.
केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर
उत्तरपत्रिका तपासणीवेळी कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडू नयेत. तसेच ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी उत्तरपत्रिका केंद्रांवर सीसीटीव्ही बसविले आहेत. उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यानंतर त्याची नोंद त्याच दिवशी परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवर केली जाणार आहे. केंद्रप्रमुखांना दोन दिवस आधी उपस्थित राहून सर्व यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही? याची चाचणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.









