घरगुती गॅस दरात वाढ : गोरगरिबांना झटका,उज्ज्वला योजनेचे अनुदान थांबले
बेळगाव : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. आधीच महागाईने कहर केला असताना सिलिंडरच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांना चटका लावणारी आहे. त्यातच उज्ज्वला योजनेंतर्गत मिळणारे अनुदानही थांबल्याने सर्वसामान्य आणि गोरगरिबांना गॅसपेक्षा आपली चूलच बरी म्हणण्याची वेळ आली आहे. गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून सिलिंडरची किंमत 850 रुपयांवरून 900 रुपये झाली आहे. त्यामुळे 50 रुपये जादा मोजावे लागत आहेत. त्याबरोबर सिलिंडर वितरकालाही गाडी भाडे द्यावे लागणार आहे. विशेषत: वाढत्या गॅसदराने ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकऱ्यांना सिलिंडर घेणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून चूल वापरण्याची वेळ आली आहे. इंधन, दूध, तेल, डाळी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यातच गॅस दरात वाढ झाल्याने गोरगरिबांना दैनंदिन गरजा भागविताना संघर्ष करावा लागत आहे.
ग्रामीण भागात शेणाच्या गोवऱ्या, लाकडाची तजवीज
वाढत्या गॅसदराने ग्रामीण भागात चुलीवरती स्वयंपाक करण्यासाठी गोवऱ्या आणि लाकडाची तजवीज केली जात आहे. चुलीवरील एक वेगळा स्वाद असतो. त्यामुळे चुलीवरील स्वयंपाकालाही पसंती दिली जाते. वाढत्या गॅस दराने गोरगरिबांचे जगणे कठीण झाले असून दैनंदिन अर्थकारणावर परिणाम झाला आहे.
उज्ज्वला योजनेचे अनुदान ठप्प
मागील काही महिन्यांपासून शासनाकडून मिळणाऱ्या उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदानही ठप्प झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि गोरगरिबांना फटका बसू लागला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा होणे बंद झाले आहे. त्यामुळे आर्थिक चणचण भासू लागली आहे.









