बेळगाव, खानापूर : खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथे ब्रम्हलिंग यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्राचा डबल महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने इराणच्या सोहेल शेखला अवघ्या पाच मिनिटात एकलांगी घालून सवारी डावावरती आसमान दाखवित उपस्थित 25 हजाराहून अधिक कुस्तीशौकीनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती महाराष्ट्राचा डबल महाराष्ट्र केसरी रूस्तू मे हिंद सिकंदर शेख व इराणचा राष्ट्रीय पदक विजेता सोहेल शेख आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, प्रमोद कोचेरी, शेखर कोचेरी, शुगर पॅक्ट्रीचे एमडी सदानंद पाटील, के. पी. पाटीलसह आदी मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला सिकंदर शेखने एकेरी पट काढत सोहेलला खाली घेऊन कब्जा मिळविला. व घिश्शावरती फिरवण्याचा प्रयत्न केला. पण सोहेलने खालून डंकी मारत सुटका करून घेतली. दुसऱ्याच मिनिटाला सिकंदरने एकेरी पट काढून सोहेलला खाली घेत पायाची एकलांगी भरून चौथ्या मिनिटाला सवारी डावावरती चीत करून विजय मिळविला.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व दिल्लीचा अमितकुमार ही कुस्ती प्रमोद कोचेरी, शेखर कोचेरी, के. पी. पाटील, खानापूर कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याहस्ते लावण्यात आली. या कुस्तीत अमितकुमारने एकेरी पट काढून कार्तिकला खाली घेत घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला पण खालून डंकी मारून कार्तिकने अमितवर कब्जा मिळविला. व पायाची एकलांगी भरून सवारी झोळी डावावर विजय मिळवित उपस्थितांची वाहवा मिळविली. व आपली घोडदौड कायम ठेवली.

तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळी व शुभम कोरण्णवर यांच्यात झाली. ही कुस्ती कोडचवाड देवस्थान कमिटीच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्याच मिनिटाला कामेशने एकेरी पट काढून मानेवरती घुटना ठेवून घुटन्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण शुभमने सुटका करून घेतली. ही कुस्ती डाव-प्रतिडावाने झुंजली व वेळेअभावी कुस्ती गुणावरती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये कामेशने एकेरी पट काढून गुण मिळवित विजय संपादन केला. चौथ्या क्रमाकांच्या कुस्तीत प्रेम कंग्राळीने गुज्जरसिंग पंजाबच्या अवघ्या चार मिनिटात ढाकेवर चीत करून विजय मिळविला. पाचव्या क्रमाकांच्या कुस्तीत पवन चिगदीनकोपने राजू कोल्हापूरे याचा पायाला एकलांगी बांधून सवारी डावावर चीत केले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत कंग्राळीच्या पार्थ पाटील आर्यन चौगुले कोल्हापूरचा एकलांगी डावावरती अवघ्या चार मिनिटात अस्मान दाखविले.

सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमेश कंग्राळी व रूद्रप्पा येमेट्टी यांच्यात डाव-प्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. आठव्या क्रमाकांच्या कुस्तीत पंकज चापगावने शुभम कंग्राळीचा झोळी डावावर पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत निखिल कंग्राळीने तुकाराम हलशीचा घुटना डावावरती पराभव केला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ पाटीलने रमेश चापगावचा एकचाक डावावरती पराभव केला. त्याचप्रमाणे राजू गंधीग्वाड, रोहीत पाटील तिर्थकुंडे, चेतन येळ्ळूर, विकास चापगाव, ओम कंग्राळी, आदिनाथ चापगाव, निनाद मजगाव आदी मल्लांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला. कुस्तीचे पंच म्हणून चेतन बुध्यण्णवर, बाळाराम पाटील, शिवाजी पाटील, भाऊ पाटील, बाहुबली बस्तवाड, सुरेश पाटील, प्रकाश बिर्जे यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन मल्लाप्पा मारीहाळ, कळ्ळय्या पुजारी यांनी केली. तर येळगुडच्या ओमकार दबाडेने आपल्या हालगीवर सर्व कुस्तीशौकीनांना खिळवून ठेवले.










