स्मार्ट सिटी-2 मध्ये निवड झाल्याने दिली भेट : विविध ठिकाणांची पाहणी : अशोकनगर येथील कार्यालयात बैठक
बेळगाव : स्मार्ट सिटी-2 योजनेत बेळगाव महापालिकेची निवड झाली असल्याने गुरुवारी फ्रान्स, जर्मनी आणि केंद्र सरकारचे पथक बेळगावला आले आहे. या पथकाकडून महापालिकेला भेट देण्यासह अशोकनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीला महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी. व स्मार्ट सिटीच्या एमडी आफरिनबानू बळ्ळारी आदी उपस्थित होते. सकाळी 10 वाजता हे पथक बेळगावात दाखल झाले. त्यानंतर बुडा कार्यालयाला भेट देऊन स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यानंतर 11.30 वाजता तुरमुरी येथील कचरा डेपोला भेट देऊन पाहणी करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून महानगरपालिकेकडून शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. याची माहिती पथकाला देण्यात आली. त्यामुळे वर्गीकरणाचे काम पाहून पथकाने मनपा अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
त्याचबरोबर कचऱ्याचे संकलन व वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सेवाकेंद्र असलेल्या सदाशिवनगर येथे भेट देऊन पाहणी करण्यात आली. जुने बेळगाव येथील कायमस्वरुपी नाईट शेल्टरमधील बायोगॅस प्रकल्पाची पाहणी केली. शिवाय खासबाग येथील कचरा वर्गीकरण केंद्रालाही भेट दिली. अखेर विश्वेश्वरय्यानगर येथील स्मार्ट सिटीच्या कमांड व कंट्रोल सेंटरला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करण्यात आली. स्मार्ट सिटी-2 योजनेसाठी बेळगाव महापालिकेची निवड झाली आहे. या योजनेतून बेळगावसाठी 135 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील साडेसात कोटींचा निधी बेळगाव स्मार्ट सिटी विभागाला वितरित करण्यात आला आहे. या योजनेतून जे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत, त्यांची माहिती घेण्यासाठी 2024 मध्ये पथक बेळगावमध्ये आले होते. आता प्रकल्पात निवड झाल्यानंतर पुन्हा हे पथक बेळगावला आले आहे. बेळगाव शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांची निर्मिती स्मार्ट सिटी-2 योजनेतून केली जाणार आहे.









