गुलबर्गामध्ये एसबीआयचे एटीएम फोडून 18 लाख लंपास
बेळगाव : बेळगाव, बिदर, बेंगळूरसह राज्यातील विविध शहरात एटीएम फोडल्याच्या प्रकरणांचा अद्याप तपास लागला नाही, तोच एटीएम फोडणारी परप्रांतीयांची टोळी कर्नाटकात पुन्हा सक्रिय झाली आहे. त्यामुळे एटीएम केंद्रांची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे. बुधवारी पहाटे गुलबर्गा येथे एसबीआयचे एटीएम फोडून 18 लाख रुपये पळविण्यात आले आहेत. या घटनेमुळे एटीएम फोडणारे परप्रांतीय गुन्हेगार पुन्हा कर्नाटकात आल्याचे उघडकीस आले आहे. गॅसकटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून मोठ्या प्रमाणात रक्कम पळविण्यात येत आहे. सांबरा येथील एसबीआयचे एटीएम फोडून 75 हजार 600 रुपये पळविले होते. 26 फेब्रुवारी रोजी पहाटे ही घटना घडली आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटकातील आणखी काही शहरात एटीएम फोडल्याचे प्रकार घडले आहेत. केवळ बिदर, बेळगावच नव्हे तर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पोलीस या टोळीच्या मागे लागले होते. मात्र, गुन्हेगार अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. बेळगाव, बेंगळूर, गुलबर्गा आदी शहरातील घटना लक्षात घेता एटीएम मशीनजवळ गेल्यानंतर गुन्हेगार प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंग स्प्रे करतात. त्यानंतर गॅसकटरने एटीएम सेफडोअर कापून मशीनमधील रक्कम पळविण्यात येते. फेब्रुवारीत महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा आदी राज्यात मोठ्या प्रमाणात एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या होत्या. कर्नाटक पोलिसांचे पथक हरियाणापर्यंतही जाऊन आले आहे. तरीही गुन्हेगारांचा थांगपत्ता लागला नाही.









