राज्यातील विक्रीमध्ये 32 टक्क्यांची घट
बेळगाव : महागाईविरुद्ध भाजपने संपूर्ण राज्यात जनआक्रोश यात्रा सुरू केली आहे. दूध, दही, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरबरोबरच मद्य व बियरचे दरही वाढवण्यात आले होते. दरवाढीमुळे उन्हाळ्यातही बियर विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. बियर विक्रीत चालू महिन्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उन्हाळा सुरू झाला की व्हिस्कीऐवजी मद्यशौकीन बियरला पसंती देतात. त्यामुळे साहजिकच बेळगावसह संपूर्ण राज्यात बियर विक्रीत वाढ होत होती. दरवाढीनंतर जानेवारीपासूनच बियर विक्री घटत चालली आहे. त्याच्या बदल्यात मद्यशौकीन कमी किमतीची व्हिस्की, रमची विक्री वाढल्याचे दिसून येते. संपूर्ण राज्यातील स्थिती वेगळी आहे तर बेळगावात बियर विक्रीवर काहीच परिणाम झाला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यातील परिस्थिती लक्षात घेता जानेवारीत 30.66 टक्के, फेब्रुवारीत 5.57 टक्के, मार्चमध्ये 15.48 टक्के बियर विक्री घटली होती.
चालू महिन्यात 32.48 टक्के घट झाली आहे. देशी मद्यविक्रीवर मात्र त्याचा परिणाम जाणवला नाही. आयएमएलची नेहमीप्रमाणेच सुरू आहे. त्यामुळेच बियरची विक्री घटली तरी सरकारच्या खजिन्यावर त्याचा थेट फटका बसत नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी 1 जानेवारी ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 1 हजार 24 लाख लिटर बियर खपली होती. याच कालावधीत चालू वर्षी मात्र 836 लाख लिटर बियर खपली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 188 लाख लिटरची तफावत झाली आहे. उन्हाळा सुरू झाला, की मद्यशौकिनांची पसंती बियरला असते. अनिवार्यप्रसंगी बियर खरेदी करताना महागाड्या ब्रँडपेक्षा कमी किमतीच्या ब्रँडची बियर खरेदी केली जात असल्याचे दिसून येते. 20 जानेवारीपासून बियरवरील अबकारी करात अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे. एका बाटलीमागे 10 ते 50 रुपये दरवाढ झाली आहे. वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे बियर शौकिनांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते. यासंबंधी बेळगाव येथील अबकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बेळगाव जिल्ह्यात मात्र दरवाढीचा परिणाम जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले.









